निंबायती फाट्यावर प्रवाशांसाठी असलेल्या बस निवाऱ्यात अतिक्रमण, बस निवाऱ्या समोरील ढाब्यात अवैधरीत्या दारू विक्री, कारवाई करणार कोण?--




दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.03 - सोयगाव-चाळीसगाव या राज्य महामार्ग क्रमांक 24 वरील निंबायती फाटा येथे दहा लाख रुपये खर्च करून प्रवाशांसाठी नवीन बस निवारा उभारण्यात आला. काही महिन्यांपूर्वी या बस निवाऱ्याचे लोकार्पण राज्याचे माजी पणन मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र एका व्यवसायिकाने बसस्थानकातच दुकान थाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
        याबाबत सविस्तर माहिती अशी, सोयगाव-चाळीसगाव या राज्यमहामार्ग क्रमांक 24 वर निंबायती फाटा आहे . निंबायती,न्हावी तांडा,रामपूर तांडा ही गावे फाट्यापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर आहे. निंबायती गावातून बस गाड्या जात नसल्याने या गावातील नागरिकांना प्रवासासाठी निंबायती फाट्यावर येऊन बसावे लागते. प्रवाशांना निवाऱ्याची सोय व्हावी यासाठी राज्याचे माजी पणन मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांच्या निधीतून दहा लाख रुपये खर्च करून निंबायती फाटा येथे बस निवारा बांधण्यात आला. काही महिन्यांपूर्वी माजी पणन मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांच्याहस्ते बस निवाऱ्याचे लोकार्पण करण्यात आले. दरम्यान बस निवाऱ्यातच एका व्यक्तीने अतिक्रमण करीत रसवंती व कोल्ड्रिंगचा व्यवसाय सुरू केला आहे.वाढत्या उन्हामुळे रसवंती जवळ मधमाशांचा वावर वाढत आहे त्यामुळे प्रवाशांना धोका निर्माण झाला आहे. निंबायती, न्हावितांडा, रामपूर तांडा या गावातील नागरिकांना एक ते दीड किलोमीटर अंतर  पायपीट करीत निंबायती फाट्यावर प्रवासासाठी यावे लागते.बस निवाऱ्यात अतिक्रमण झाले असल्याने प्रवाशांना बसण्यासाठी उन्हातान्हात झाडाचा आसरा घ्यावा लागत आहे. बस निवाऱ्या समोर एक ढाबा असून त्याठिकाणी अवैधरीत्या देशी विदेशी दारूची सर्रास विक्री केली जात आहे. यामुळे बस निवाऱ्यात महिला, महाविद्यालयीन तरुणी यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.एकीकडे महिलांच्या सुरक्षेविषयी संवेदनशील असल्याचा आव सरकार आणत आहे तर दुसरीकडे बस निवाऱ्याच्या समोरच अवैधरीत्या दारू विक्री केली जात आहे.मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते आहे. परंतु पोलीस प्रशासनास अद्यापही काही फरक पडलेला नाही. उलट अवैधधंदे वाईकांशी पोलिसांची घट्ट मैत्री झाल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे. पोलीस प्रशासन काय कार्यवाही करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तर सार्वजनिक बांधकाम विभागाने बस निवारा तात्काळ मोकळा करण्यात दयावा अशी मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.
(सहयोगी बातमीदार दिलीप शिंदे सोयगाव)

Post a Comment

0 Comments