दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.23 - सोयगाव वनपरिक्षेत्रातून लाकडाने भरलेला ट्रक दि.22 बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास फरदापुरच्या दिशेने जात असल्याची माहिती वृक्षप्रेमी व जागरूक नागरिकांना मिळाली. जंगलतांडा येथील जागरूक नागरिकांनी जीव धोक्यात घालून लाकडाचा ट्रक फरदापुर येथे पकडुन सोयगाव वनपरिक्षेत्रात कार्यरत असलेल्या वनरक्षक शरद चेके व सहकारी यांच्या ताब्यात दिला.
मात्र पकडलेला ट्रक अजिंठा वनविभाग व सोयगाव वनविभाग येथे आढळून आला नाही याबाबत सोयगाव वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल मिसाळ यांच्याशी संपर्क साधला असता सविस्तर माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याने आर्थिक व्यवहारातून सोयगाव वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वाहन सोडून दिल्याची चर्चा सोयगाव तालुक्यात रंगली आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या हप्तेखोरी बाबत मुख्यमंत्री, वनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ना.संजय सिरसाट यांच्याकडे पुराव्यासह लेखी तक्रार देऊन निलंबनाची मागणी करणार असल्याचे भाजपचे सुनील गावंडे व मंगेश सोहनी यांनी सांगितले. या थरार प्रकरणामुळे सोयगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे
याबाबत सविस्तर माहिती अशी, सोयगाव वनपरिक्षेत्रात अनेक वर्षांपासून अवैधरीत्या वृक्षांची कत्तल केली जात आहे. या प्रकाराविषयी सोयगाव वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल मिसाळ यांना अवैधरीत्या लाकडे भरून वाहतूक करणाऱ्या वाहनाचे लोकेशन देऊनही कार्यवाही होत नसल्याने अखेर दि.22 बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास सोयगाव वनपरिक्षेत्रातून लाकडाने भरलेल्या ट्रकची गोपनीय माहिती मिळताच जंगलातांडा व फरदापुर तांडा येथील जागरूक नागरिकांनी जीव धोक्यात घालून दुचाकीने ट्रक पकडण्यासाठी थरारक प्रयत्न केले. अजिंठा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या फरदापुर येथे लाकडाने भरलेला ट्रक पकडण्यात आल्याची माहिती सोयगाव वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल मिसाळ यांनी बुधवारी रात्री 9:24 मिनिटानी भ्रमणध्वनीद्वारे दिली. मात्र सोयगाव तालुक्याचा भाग असलेले फरदापुर हे अजिंठा वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असल्याने सदरील ट्रक हा अजिंठा वनविभागाकडे सोपविण्याबाबत अजिंठा वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी कळविल्याचे सांगितले. ट्रक जवळ सोयगाव चे वनरक्षक शरद चेके हे कर्तव्य बजावत होते. सोयगाव वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल मिसाळ यांनी दिलेल्या माहितीची पडताळणी करण्यासाठी अजिंठा वनपरिक्षेत्राचे अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी सांगितले लाकडाने भरलेला ट्रक फरदापुर येथे पकडण्यात आला असून तो आपल्या ताब्यात घेण्यात यावा, ट्रक ताब्यात घेण्यासाठी एक वनपाल व दोन वनरक्षक फरदापुर येथे पंधरा मिनिटांत पोहचतील असे प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले. मात्र ट्रक अजिंठा वनपरिक्षेत्राचे कर्मचारी ट्रक ताब्यात घेण्यास पोहचले असता त्यांना ट्रक ताब्यात न देताच रिकामी हाती पाठविले. सदरील ट्रक हा सोयगाव वनविभागाच्या ताब्यात सुद्धा नसल्याने सोयगाव वनविभागाच्या हप्तेखोरी मुळे लाकडाचा पकडलेला ट्रक सोडून दिल्याने ट्रक पकडण्यास मदत करणाऱ्या जागरूक नागरिकांमधून सोयगाव वनविभागाच्या भ्रष्टाचारी कारभारा विषयी संताप व्यक्त केला जात आहे. सोयगाव वनविभागाच्या नाकारते पणामुळे सोयगाव तालुक्यात अवैधरीत्या वृक्षांची केली जाणारी कत्तल मध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री, वनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडे पुराव्यासह लेखी तक्रार करून संबंधित अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना निलंबित न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपचे सुनील गावंडे व मंगेश सोहनी यांनी दिला आहे. रात्रीच्या पाठलागचा थरारा बाबत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून वाहनांवर कार्यवाही झाली नसल्याचे शल्य बोचत राहील अशी खंत नागरिकांनी बोलून दाखवली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे उपवनसंरक्षक याप्रकरणी चौकशी करून कार्यवाही करतात की अधिकाऱ्यांना पाठीशी घालतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
--- सोयगाव वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल मिसाळ यांचा अजब कारभार-
अनिल मिसाळ यांना अवैधरीत्या वृक्षांची कत्तल करून तस्करी करणाऱ्या लाकूड तस्करांच्या लाकडांने भरलेल्या ट्रक चे लोकेशन दिल्यावर कार्यवाही साठी वनविभागाचे कर्मचारी रस्त्यावर असल्याचे फोटो टाकून कार्यवाही करण्याचा आव आणणारे वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल मिसाळ यांनी मात्र बुधवारी लाकडांने भरलेल्या ट्रकचा फोटो व सविस्तर माहिती देणे टाळल्याने या अधिकाऱ्याच्या कर्तृत्वावरच जागरूक नागरिक व वृक्षप्रेमींनी प्रश्न चिन्ह निर्माण केले आहे.
0 Comments