दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.०८ - सोयगाव सह तालुक्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून वातावरणात बदल झाल्यामुळे बोचऱ्या थंडीने चांगलाच जोर पकडला आहे. थंडीने नागरिकांना चांगलीच हुडहुडी भरत आहे.
थंडीपासून संरक्षण मिळण्यासाठी सोयगावसह ग्रामीण भागात सकाळी व सायंकाळी ठिकठिकाणी शेकोट्या पेटवण्यात येत आहेत. थंडीचा परिणाम लहान मुलांसह ज्येष्ठांच्याही दिनचर्येवर झाला आहे.बोचऱ्या थंडीपासून बचाव करण्यासाठी आबालवृद्ध स्वेटर, मफलर, कानटोपी आदी उबदार कपड्यांचा वापर करत आहेत. ग्रामीण भागात शेत शिवारामुळे दिवसभर बोचरे वारे अंगाला झोंबत आहे.
दरम्यान वातावरणातील बदलामुळे सकाळी फिरायला जाणाऱ्या लोकांना सर्दी, खोकल्याचाही त्रास वाढला आहे. त्या दृष्टीने सतर्कता म्हणून तोंडाला मास्क अथवा रुमाल बांधूनच फिरायला जावे.
--बोचरी थंडी रब्बीसाठी पोषक--
बोचरी थंडीमुळे पिके बहरण्यास सुरुवात झाली आहे. रब्बी पिकास पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
गहू, हरभरा आता बहरताना दिसत आहेत. या थंडीचा रब्बी पिकांसाठी फायदा होणार आहे.
या बोचऱ्या थंडीमुळे ग्रामस्थांची दिनचर्या विस्कळीत झाली आहे. दिवसभर गार जाणवत असताना सायंकाळी थंडीची तीव्रता वाढत आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी शहरासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिसत आहेत. ग्रामीण भागात शेकोटीभोवती बसून विविध विषयांवर चर्चाही झडतात. हवामानातील बदल आणि थंडीमुळे आजारांनी डोके वर काढले आहे.
0 Comments