पश्चिम वाहिन्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात आणून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणार--ना. राधाकृष्ण विखे पाटीलराहता येथे ना. विखे पा. यांचा भव्य असा नागरी सत्कार संपन्न!

शिर्डी ( प्रतिनिधी) महाराष्ट्रातील शेतकरी सुखी समाधानी झाला पाहिजे .त्यासाठी महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याची जबाबदारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी तसेच गृहमंत्री अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी  माझ्यावर सोपवली असून पश्चिम वाहिन्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. त्याचा आराखडा करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या असून त्यासाठी सुमारे 50 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

राहता तालुका तसेच शिर्डी विधानसभा मतदार संघाच्या वतीने प्रथमच नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे जलसंपदा मंत्री झाले व त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री झाले त्याबद्दल त्यांचा भव्य असा सत्कार करण्यात आला. सत्कारापूर्वी नामदार विखे पा.यांची राहता शहरातून जंगी मिरवणूक काढण्यात आली. राहता शहरातील नवनाथ मंदिर, ग्रामीण रुग्णालय, नगर मनमाड रस्त्यावरून श्री वीरभद्र मंदिरापर्यंत ही भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. ना.विखे यांनी श्री वीरभद्र मंदिरात आल्यानंतर दर्शन व छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
 त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के होते.
यावेळी मान्यवर म्हणून आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार अमोलजी खताळ, तसेच ह भ प उद्धव महाराज मंडलिक, मंहत काशीकानंद महाराज, महानुभाव पंथाचे अध्यक्ष लाड महाराज, मौलाना, आदींसह संत महंत नेते यावेळी उपस्थित होते.
 यावेळी नामदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, राहता तालुक्याने ,शिर्डी मतदार संघाने मला आठ वेळेस निवडून दिले. त्याची जाण आहे. त्यामुळेच आपण हा माझा विजय मतदार संघाला समर्पित केलेला आहे. आपण आजपर्यंत समर्पित भावनेने काम करत आलो. आहोत व पुढेही करणार आहोत. जिल्ह्यात महायुतीच्या आमदारांची चांगली टीम असून जिल्ह्यामध्ये विकासाच्या दृष्टीने अनेक योजना, उपक्रम राबवण्याचा प्रयत्न असणार आहे. अहिल्यानगर येथे भव्यदिव्य असे माता अहिल्याबाई होळकर यांचे स्मारक, तसेच नेवासा येथे संत ज्ञानेश्वर मंदिराचा सातशे कोटींचा विकास आराखडा राबविण्यात येणार आहे. शिर्डी एमआयडीसी, तसेच विविध उपक्रम राबवून तालुक्यातील , जिल्ह्यातील सुमारे पाच हजार तरुणांना रोजगार उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे. सिंचनाबद्दलही विविध योजना राबवण्यात येणार आहे.असे सांगत मुंगेरीलाल प्रमाणे स्वप्न पाहणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले.व सर्व मतदारांचे कार्यकर्त्यांचे यावेळी त्यांनी आभार मानले.
यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे यांनी सांगितले की आमदार विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जिल्ह्यात अधिकाधिक विकास करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यांचे सर्व दृष्टीने आम्हाला सहकार्य मिळते. तर आमदार अमोल खताळ म्हणाले की, माझ्यासारख्या सर्व सामान्य कार्यकर्त्यांना संगमनेरचे लोकप्रतिनिधी म्हणून जी संधी मिळाली ती नामदार राधाकृष्ण विखे पाटील, डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मुळेच मिळाली. या संधीचा मी जनतेच्या विकासासाठी राहणार असल्याचे सांगितले. यावेळी ह भ प उद्धव महाराज मंडलिक म्हणाले की नामदार विखे हे सहकार शिक्षण सामाजिक अशा सर्व क्षेत्रात कार्य करीत असताना  अध्यात्मिक क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान आहे. असे सांगितले.
  यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांचेही भाषण झाले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शिर्डी मतदारसंघातील कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमात सर्व लाडक्या बहिणींना फेटे बांधून सन्मानित करण्यात आले होते.

Post a Comment

0 Comments