सात्रळ महाविद्यालय तिसऱ्यांदा नॅक मूल्यांकनासाठी सज्ज - प्राचार्य डाॅ. सोपान शिंगोटे






राहुरी / प्रतिनिधी : विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र शासनाच्या व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नियमानुसार राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद, बेंगलोर यांच्या वतीने नॅक समितीची लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सात्रळ येथे नॅक समिती दि. ८ व ९ जानेवारी २०२५ रोजी महाविद्यालयास भेट देणार आहे.



 अवघ्या पंचवीस वर्षाच्या कालावधीत महाविद्यालयाने विद्यापीठात व परिसरात आपला नावलौकिक मिळविला आहे. महाविद्यालयास नॅकचा ब ++ दर्जा प्राप्त असून थर्ड सायकल पुनर्मूल्यांकनासाठी महाविद्यालय पुन्हा सज्ज झाले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोपानराव शिंगोटे यांनी दिली.
      प्रवरेच्या परिसरातच नव्हे तर, अखिल सहकारी क्षेत्रातच पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील या नाममुद्रेला एक आगळे-वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे. या भूमिपुत्रांने ग्रामीण भागात औद्योगिक उन्नतीचा वसा घेतला आणि महाराष्ट्राला शैक्षणिक, सामाजिक आणि औद्योगिक शांत क्रांतीची एक नवी दिशा दाखवली. पद्मश्रींचा हाच विचार पुढे नेताना पद्मभूषण खा. डॉ. बाळासाहेब विखे पा. यांनी उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये आपली कल्पकता आणि आधुनिक दूरदृष्टी यामधून सामाजिक बदलांचा वेध घेतला. महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री मा. ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्याला प्रयोगशीलतेची जोड दिली. त्यामुळेच प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सात्रळ येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय एक उपक्रमशील महाविद्यालय म्हणून ग्रामीण भागात ख्याती प्राप्त असल्याचे ते म्हणाले. 
   शैक्षणिक आणि सामाजिक विकास कार्याबद्दल सात्रळ महाविद्यालयास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उत्कृष्ट एन.एस.एस. एकक आणि जिल्हास्तरीय उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार तसेच राज्यस्तरीय 'हरित व स्वच्छ महाविद्यालय' पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. युजी ते पीजी तसेच रसायनशास्त्र विभाग संशोधन केंद्र महाविद्यालयात कार्यरत आहे. भारत सरकारचे पेटंट, विविध संशोधन प्रकल्प, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पातळीवरील चर्चासत्रांचे आयोजन, मागासवर्गीय व सर्वसाधारण गटातील विद्यार्थ्यांना विविध शासकीय शिष्यवृत्ती प्राप्त झालेल्या आहेत.  विद्यार्थ्यांना भविष्यात रोजगाराच्या संधी मिळाव्या म्हणून महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्याधिष्ठित विविध कोर्स, महाराष्ट्र शासन सेतू कार्यालय सुविधा, आंतरविद्याशाखीय प्रमाणपत्र अभ्यासक्रम, मोफत पोलीस/सैनिकी भरती प्रशिक्षण, नोकरी, व्यवसाय मार्गदर्शन केंद्र, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी करिअर कट्टा, इंग्लिश लैंग्वेज लॅब, गरीब विद्यार्थी सहाय्य निधी योजना कार्यरत आहे. अद्यावत साधनांनी सुसज्ज विज्ञान शाखेच्या प्रयोगशाळा आणि ग्रंथालय, अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी सदैव उपलब्ध आहेत.
       विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. त्यांच्या जडणघडणीमध्ये महाविद्यालयात राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांचा मोठा वाटा आहे. महाविद्यालयाचे ग्रंथालय, राष्ट्रीय सेवा योजना व कमवा व शिका योजना हे महाविद्यालयाचा आत्मा आहेत. विद्यापीठ निकालामध्ये महाविद्यालयाने यशस्वी निकालाची परंपरा सातत्यपूर्ण जपली आहे. वृक्षवेलींनी नटलेल्या प्रदूषणविरहित निसर्गरम्य परिसरात महाविद्यालयाची प्रशस्ती इमारत सदैव क्रियाशील आहे. यावेळी महाविद्यालयातील अध्ययन-अध्यापन, संशोधन, भौतिक सुविधा आणि अभ्यासपूरक व अभ्यासेतर तसेच सामाजिक उपक्रमांचे मूल्यांकन होणार आहे. सदर समिती माजी विद्यार्थी, पालक, आजी विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधणार आहेत.
         ग्रामीण भागात शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोहोचवताना आणि सात्रळ महाविद्यालयाच्या पंचवीस वर्षाच्या वाटचालीमध्ये डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बहुमोल मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाची वाटचाल सुरू आहे. माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुश्मिता विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, पंचक्रोशीतील कार्यकर्ते आणि पालक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे, प्राचार्य डॉ. सोपानराव शिंगोटे, उपप्राचार्य, नॅक समन्वयक आदी महाविद्यालय विकासक्रमात वेळोवेळी मार्गदर्शन करत आहेत. वरील सर्वच उपक्रमांना विद्यार्थी-विद्यार्थिनींचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

Post a Comment

0 Comments