सावळीविहीर‌ बु. येथील सागर गोकुळ जपे यांची भारतीय सैन्य दलात लेफ्टनंटपदी निवड!4 जानेवारी 2025 ला काश्मीरच्या लडाख जवळील हिमाचल सुमूधो येथे 20 कुमाऊ रेजिमेंट मध्ये होणार दाखल!गावातून प्रथमच सेना अधिकारी बनलेल्या सागरचा सर्वत्र होत आहे सन्मान व अभिनंदन!

शिर्डी (राजकुमार गडकरी) राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथील रहिवासी व उक्कडगाव येथील विद्यालयात प्राध्यापक असणारे प्रा. गोकुळ जपे सर यांचे चिरंजीव सागर गोकुळ जपे हे नॅशनल डिफेन्स अकॅडमी, (एनडीए)पुणे  येथून उत्तीर्ण होऊन व त्यानंतर डेहराडून येथे  एक वर्ष खडतर लष्करी प्रशिक्षण घेऊन भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट या पदी नियुक्ती झाले‌


 असून त्यांचे सावळीविहीर, उक्कडगाव सह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातून अभिनंदन होत आहे.
  ग्रामीण भागातील असणारा सागर याने आपले प्राध्यापक वडील गोकुळ जपे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव येथे शारदा इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये प्राथमिक शिक्षण घेतले.

 त्यानंतर सहा महिने सागर हिमाचल मध्ये आर्मी पब्लिक स्कूलला होता व त्यानंतर अकरावी व बारावी सायन्स ही  त्याने आर्मी पब्लिक स्कूल मधून पश्चिम बंगाल मध्ये केली. पहिल्यापासूनच भारतीय सैन्य दलात जाण्याची ओढ असल्यामुळे त्याने बाहेर राज्यात राहून सुद्धा आर्मी स्कूलमध्ये शिक्षण घेतले. अभ्यास,जिद्द, मेहनत करत त्याने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी एनडीए मध्ये जाण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले व एन डी एच्या  पात्र परीक्षा उत्तीर्ण होऊन पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी मध्ये प्रवेश मिळवला .तेथे बौद्धिक ,शारीरिक व लष्करी असे तीन वर्षाचे खडतर  प्रशिक्षण घेतले. व डिग्रीही  हस्तगत केली. एन डी ए मध्ये मेरिटने उत्तीर्ण झाल्यानंतर सुमारे 208 तरुणांबरोबर डेहराडून  येथे विशेष लष्करी एक वर्षाचे प्रशिक्षण त्यांचे झाले. या प्रशिक्षणानंतर सागर याची लेफ्टनंट म्हणून भारतीय सैन्य दलात नियुक्ती झाली आहे. 4 जानेवारी 2025 रोजी जम्मू काश्मीरमधील लडाख जवळील हिमाचल सुमधू या पोस्टच्या ठिकाणी वीस कुमाऊ या रेजिमेंटमध्ये ते जॉईंट होणार आहेत .
भारतीय सैन्य दलात नॅशनल डिफेन्स अकॅडमी मधून व सर्व परीक्षा आणि प्रशिक्षण उत्तीर्ण होऊन लेफ्टनंट पदावर नव्याने नियुक्त होत असलेले सागर गोकुळ जपे हे राहता तालुक्यातून एकमेव तरुण असल्याचे बोलले जाते. त्यांचे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामधून अभिनंदन होत आहे.राहाता तालुक्यातून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. तसेच त्यांचा या निवडीबद्दल सत्कार करण्यात येत आहे.  गोकुळ जपे सर यांचे पुतणे किरण बबनराव जपे तसेच अशोक गोरखराव जपे हेही यापूर्वी भारतीय सैन्य दलात होते.सावळीविहीर येथील मित्र मंडळाच्या वतीने लेफ्टनंट सागर व वडील गोकुळ जपे यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.  नुकतीच निवड झालेले लेफ्टनंट सागर जपे यांनी यावेळी सांगितले की,देश सेवा करण्याची जिद्द पहिल्यापासून मनात होती. त्यामुळे मोठी मेहनत घेत राहिलो. व त्याला यश आले. या यशामागे माझे आई ,वडील शिक्षक व माझे सर्व हितचिंतक यांच्याही मोठे श्रेय असल्याचे त्यांनी सांगत अभिनंदन व सत्कार केल्याबद्दल सर्वांचे त्यांनी यावेळी आभार मानले.यावेळी लेफ्टनंट सागरचे वडील गोकुळ जपे सर यांनी सांगितले की, सागरने भारतीय सैन्य दलात जाण्यासाठी आमचे प्रयत्न होतेच. मात्र सागर याने खूप मोठी मेहनत घेतली व त्यामुळेच हे यश मिळाले आहे. असे सांगत सागर प्रमाणे इतर तरुणांनीही भारतीय सैन्य दलाकडे वळले पाहिजे. एनडीए मध्ये शहरी भागातीलच मुले जातात. असे नाही तर ग्रामीण भागातील ही मुले जाऊ शकतात. व भारतीय सैन्य दलात अधिकारी होऊ शकतात. मात्र त्यासाठी जिद्द प्रत्येकाने ठेवली पाहिजे. असे सांगत भारतीय सैन्य दलात सेवा करणे ही प्रतिष्ठेची व अभिमानाची गोष्ट मानली जाते. भारतीय सैन्य दल जगामध्ये सर्वोत्कृष्ट असे सैन्यदल असून या भारतीय सैन्य दलात अधिकारी होण्यासाठी नॅशनल डिफेन्स अकॅडमी ही लष्करी प्रशिक्षण संस्था आहे. देशात पाच सेंटर आहेत. साडेसोळा ते 19 वयो वर्षाच्या दरम्यान बारावी किंवा बारावी नंतर यूपीएससी तर्फे घेण्यात येणारी एनडीए  पात्र परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर एनडीए मध्ये प्रवेश मिळतो. एन डी ए मध्ये तीन वर्षे प्रशिक्षण घेतल्यानंतर डिग्री ही मिळते. त्यानंतर प्रशिक्षणार्थी हे वायुदल नौदल किंवा सेना दलाची निवड करू शकतात. नौ दलाचे केरळमध्ये तर वायुदलाचे हैदराबाद मध्ये आणि सेनादलाचे डेहराडून मध्ये लष्करी प्रशिक्षण एक वर्षाचे असते. तेथे खडतर लष्करी प्रशिक्षण झाल्यानंतर भारतीय सैन्य दलात स्टाफ कमिशन सिलेक्शन नंतर भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदी नियुक्ती होते. भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट ही अधिकारी रेंजची प्रथम पोस्ट आहे. लेफ्टनंट नंतर दोन वर्ष झाल्यानंतर कॅप्टन व  त्यानंतर सहा साल पूर्ण झाल्यानंतर मेजर तसेच तेरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर लेफ्टनंट कर्नल तर सैन्य दलात 26 साल पूर्ण झाल्यावर कर्नल असे अधिकारी पदी निवड होते. कर्नल नंतर ब्रिगेडर, मेजर जनरल ,जनरल अशा रेंज वाढत जातात. तरुणांनी देश सेवा करण्यासाठी उत्स्फूर्त झाले पाहिजे. लहानपणापासूनच भारतीय सैन्य दलात जाण्याची ओढ असली व जिद्द ठेवली तर नक्कीच सागर सारखे यश मिळू शकते.  ग्रामीण भागातील तरुणांना लष्करी अधिकारी होण्यासंदर्भात अधिक माहिती नसते. ती घेतली पाहिजे व तसा प्रयत्न केला पाहिजे. नक्कीच यश मिळते .असे त्यांनी शेवटी सांगितले.

Post a Comment

0 Comments