शिर्डी (प्रतिनिधी)
साईचरणी विश्वासानं नतमस्तक झाले तर नक्कीच यथोचित फळ मिळते. असा माझा अनुभव आहे. त्यामुळे श्रद्धा सबुरी चा संदेश देणाऱ्या या जगाच्या मालकाच्या चरणावर निष्ठेने, संयमाने ,भक्तीने नतमस्तक झाले तर नक्कीच आपल्यालाही त्याची अनुभूती मिळेल. असे मत प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प शिवलीला पाटील यांनी व्यक्त केले.
ह भ प कु.शिवलीला पाटील यांनी शिर्डीला भेट देऊन श्री साई समाधी मंदिरात जाऊन श्री साईबाबांचे दर्शन घेतले. साई दर्शनानंतर त्यांचा साई संस्थांनच्या वतीने प्रशासकीय अधिकारी भिकन दाभाडे यांनी शाल प्रसाद देऊन सत्कार केला. प्रसिद्ध कीर्तनकार हभप कु. शिवलीला पाटील यावेळी पुढे म्हणाल्या की, भागवत भक्तीचा मोठा मार्ग हा संतांच्या स्पर्शाने सुरू होतो. त्यामुळे संतांचे चरणावर नतमस्तक होणं गरजेचं आहे. देव मानला तर आहे, नाही मानला तर नाही. मात्र ही सर्व सृष्टी चालवणारी बोलवणारी एकच अशी शक्ती आहे व ती परमेश्वर आहे.या देव, परमात्मा ,जगाच्यामालकाची सत्य अनुभूती अनुभवायची असेल तर संतचरणपदस्पर्शा शिवाय पर्याय नाही. संत भगवंताच्या चरणी नतमस्तक होऊन नक्कीच तशी अनुभूती मिळते. साईबाबांनी श्रद्धा सबुरीचा संदेश दिला. श्रद्धा म्हणजे निष्ठा व सबुरी म्हणजे संयम, श्रद्धा सबुरी ठेवली तर नक्कीच परमेश्वर अस्तित्वाची अनुभूती येते. विश्वास महादेवाचे रूप आहे व श्रद्धा पार्वतीचे रूप आहे .विश्वास व श्रद्धा चे पाणी ग्रहण होते. तेव्हा विवेक जन्माला येतो. असे सांगत साधू संतांना धर्म कुळ गोत्र जात पात नसते. साईंचेही तेच आहे. त्यामुळे साईंचे अस्तित्व ही या सर्वांच्या पलीकडे आहे.
संत हे तुमच्या आमच्या उद्धारासाठी जन्म घेतात. एवढेच नव्हे तर निर्जीवाचाही उद्धार करण्यासाठी भगवंत असतो .म्हणूनच अशा संत रुपी भगवंताच्या या साईचरणी नतमस्तक होऊन सकारात्मक ऊर्जा प्राप्त करणे महत्त्वाचे आहे .नाम चिंतनात तसेच संतांच्या, भगवंतांच्या पदस्पर्शामध्ये सकारात्मक शक्ती, ऊर्जा आहे व शिर्डीतही साईचरण पदस्पर्शाने ही शक्ती नक्कीच मिळते. साई दर्शनाने समाधान, अध्यात्मिकता मिळतेच पण येथे आल्यानंतर सर्वोच्च अध्यात्मिक, आत्मिक समाधानाच्या पातळीपर्यंतही आपणाला पोहोचवते. त्यामुळे शिर्डीत साई चरणी शिक्षित ,अशिक्षित, गरीब, श्रीमंत, उंच,निच,सर्व जाती धर्माचे भक्त येतात , नतमस्तक होतात.व तशी अनुभूतीही घेतात. आपणही साईचरणी नतमस्तक होण्यासाठी आलो असून साई दर्शनाने मोठे समाधान व सकारात्मक उर्जा, आनंद, समाधान ,मनाला मिळाल्याचे, यावेळी हभप शिवलीला पाटील यांनी सांगितले.
0 Comments