दिलीप शिंदे
सोयगाव दि.२७-- सोयगाव तालुक्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंचायत समिती कार्यालयात ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याचा धक्कादायक प्रकार शिवसेनेचे शहरप्रमुख संतोष बोडखे,नगरसेवक राजू दुतोंडे,दीपक पगारे,हर्षल काळे,लतिफ शहा,रऊफ शेख, मराठा प्रतिष्ठान चे जिल्हाध्यक्ष विजय काळे, आमखेडा गणाच्या पंचायत समिती सदस्या यांचे पती गजानन पवार यांच्या समोर उघडकीस आल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
विशेष म्हणजे शिपायाला पाणी घेऊन ये असा आदेश देणारे अधिकारी,कर्मचारी,सभापती व सदस्य यांनी सोयीस्करपणे दुर्लक्ष केल्याने पंचायत समितीच्या शिपायाला स्वतःच्या पगारातून पाणी पुरवठा करणाऱ्याला ६०००/₹ द्यावे लागले ही मोठी शोकांतिका असल्याची चर्चा तालुक्यात सुरु आहे.
पंचायत समिती मार्फत , महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ अन्वये कृषी, पशुसंवर्धन, ग्रामीण पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, महिला व बालकल्याण, समाजकल्याण आणि रोजगारविषयक केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना राबविल्या जातात.कृषी व सिंचन: डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, सिंचन विहीर अनुदान, फळबाग लागवड, कडबा कुट्टी मशीन आणि सौर कृषी पंप/बायोगॅस यांसारख्या उपक्रमांची अंमलबजावणी केली जाते. पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय: गाय-म्हशी वाटप/अनुदान, कुक्कुटपालन आणि पशुसंवर्धन विभागाच्या योजना राबविल्या जातात. ग्रामीण गृहनिर्माण व पायाभूत सुविधा: घरकुल योजना (उदा. रमाई आवास घरकुल योजना), पानंद रस्ते व दळणवळण, ग्रामीण पाणीपुरवठा, स्वच्छता आणि रोजगार योजनांची कामे होतात. तर महिला, बालकल्याण व समाजकल्याण: मुलींसाठी सायकल, महिलांसाठी शिलाई मशीन, दिव्यांगांसाठी उपकरणे तसेच मागासवर्गीय, महिला व बालविकासासाठी विविध लाभ योजना राबविल्या जात असल्याने ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांची पंचायत समितीच्या कार्यालयात वर्दळ असते. कार्यालयात पिण्यासाठी पाणी नसल्याने कामासाठी आलेल्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटंकती करावी लागत आहे.पंचायत समिती कार्यालय भाजप शिवसेनेची सत्ता असून देखील शिपायाला स्वतःच्या पगारातून ६००० रु पिण्याच्या पाण्याचे बिल भरावे लागल्याने हा मोठा चर्चेचा विषय ठरला आहे.ग्रामीण भागातून कामानिमित्त पंचायत समिती कार्यालयात पिण्यास पाणी मिळेल किंवा नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
0 Comments