सोयगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या बांधकामाचा विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या हस्ते शुभारंभ, आमदार अब्दुल सत्तार अध्यक्षस्थानी



दिलीप शिंदे 
सोयगाव दि.१८-- सोयगाव तालुक्यातील तमाम शिवप्रेमींच्या जिव्हाळ्याचा आणि स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा दि. २२ नोव्हेंबर रविवार रोजी नगरपंचायत कार्यालय प्रशासकीय इमारत परिसरात दुपारी ०२:०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या शुभहस्ते या स्मारकाच्या बांधकामाचा शुभारंभ होणार असून, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार असणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा, शौर्याचा आणि स्वराज्य स्थापनेच्या महान कार्याचा इतिहास भावी पिढ्यांपर्यंत पोहोचावा, तसेच सोयगाव शहराच्या वैभवात भर पडावी, या उद्देशाने या स्मारकाची उभारणी करण्यात येत आहे. सोयगाव तालुक्यातील सकल शिवप्रेमींच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या या स्मारकाच्या बांधकामासाठी आमदार अब्दुल सत्तार यांनी विशेष पाठपुरावा करून मंजुरी व भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे शिवप्रेमींचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न साकार होण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे.या ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास सोयगाव तालुक्यातील सर्व शिवप्रेमी, नागरिक आणि शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रभाकर ( आबा ) काळे, तालुकाप्रमुख धरमसिंग चव्हाण, नगराध्यक्ष आशाबी तडवी तसेच नगरपंचायतीचे पदाधिकारी व सर्व सन्माननीय नगरसेवक यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments