निळवंडे प्रकल्पातील निकृष्ट अस्तरीकरण कामाची उच्चस्तरीय चौकशी करा; नाशिकच्या सिंचन भवनसमोर आमरण उपोषण सुरू

राजेश शिंदे 

नाशिक :- निळवंडे-२ प्रकल्पांतर्गत उर्ध्व प्रवरा डावा कालव्याच्या जलसेतू अस्तरीकरण (Lining) कामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.या कामाची उच्चस्तरीय समितीमार्फत सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी,या मागणीसाठी नाशिक येथील जलसंपदा विभागाच्या'सिंचन भवन' समोर २५ नोव्हेंबर २०२६ पासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
धाडस सामाजिक संघटनेचे छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष मुसा हसन शेख,आणि छावा ब्रिगेडचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजेश रखमाजी शिंदे,यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.
निवेदनातील प्रमुख आरोप आणि तांत्रिक त्रुटी:
जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात खालील गंभीर मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत:
• अपूर्ण काम आणि गंजण्याची भीती: २०२५-२६ या वित्तीय वर्षात झालेले जलसेतूचे काम अद्याप अपूर्ण आहे. कामातील लोखंडी सळ्या (Steel Bars) उघड्या पडल्या असून त्यांना रेड ऑक्साईडचा पेंट लावलेला नाही, ज्यामुळे भविष्यात बांधकामाची मजबुती कमी होण्याचा धोका आहे.
• मातीचे कॉम्पॅक्शन आणि काँक्रीटचा दर्जा: अस्तरीकरणापूर्वी कालव्याचा पाया व बाजूची माती ९५ टक्के प्रॉक्टर डेन्सिटीपर्यंत घट्ट (Compact) करणे बंधनकारक असताना तसे केलेले नाही. तसेच काँक्रीटसाठी M15 किंवा M20 ग्रेडऐवजी मिश्रित खडी वापरल्याने कामात सफाई नाही.
• काँक्रीट स्लॅबची जाडी आणि जॉइंट्स: स्लॅबची जाडी १०० मिमी असणे आवश्यक असताना ती कमी-जास्त आहे. तडे जाऊ नयेत म्हणून ३ ते ४ मीटर अंतरावर सांधे (Joints) देणे गरजेचे असताना कमी अंतरावर सांधे दिले आहेत.
• प्रयोगशाळेची केवळ कागदोपत्री तपासणी: मे महिन्यात जास्त तापमानात काम केल्याने व सिमेंटवर कमी पाणी वापरल्याने कामाची मजबुती राहिलेली नाही. प्रत्यक्ष साहित्य प्रयोगशाळेत न पाठवता Quality Control Lab कडून केवळ कागदावरच प्रमाणित करून घेतल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
चौकशी आणि कारवाईची मागणी:
निळवंडे प्रकल्पाच्या धरण विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे आणि उपअभियंता जगदीश धारोळे यांच्या कार्यकाळात झालेल्या या कामाची गुणनियंत्रण विभाग (धुळे) किंवा उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करावी. तसेच कामावर संनियंत्रण ठेवण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या शाखा अभियंता व उपअभियंत्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. "चौकशी झालीच पाहिजे, जनतेच्या पैशाचा हिशोब मिळालाच पाहिजे," अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

Post a Comment

0 Comments