सावळीविहीर बुद्रुक येथील प्रसिद्ध व पुरातन असणाऱ्या पाटावरील श्रीदेवी भवानी मातेचा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात सुरू झाला असून येथे विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत. सावळी विहीर येथील नगर मनमाड महामार्गाच्या पश्चिमेला समोर एक किलोमीटर अंतरावर पाटाच्या तीरावर हे श्री भवानी माता सुंदर व भव्य असे पूर्वमुखी मंदिर असून येथे नवरात्रीमध्ये भाविकांची दर्शनाला गर्दी होत असून सातव्या माळेला येथे मोठी यात्रा भरणार आहे.
या श्री देवी भवानी माता मंदिरात घटस्थापनादिनी विधिवत पूजन करून नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला. दरवर्षीप्रमाणे वर्षीही मंदिरासमोरील दीपमाळे जवळ अनेकांनी घटस्थापना केली आहे. मंदिरात काही महिलाही या नवरात्रीत घटी बसल्या आहेत. येथे सकाळ ,संध्याकाळ पूजा आरती होत असून येथे दररोज मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत आहेत. या मंदिरात श्री भवानी माताची मनमोहक मूर्ती असून जवळच भक्तांकडून स्थापित श्री कालिका देवीची सुंदर अशी मूर्ती आहे. येथे अनेक जण नवस करतात.व नवपूर्तीसाठी नवरात्रीत येथे येतात. विशेष म्हणजे नवस फेडण्यासाठी पशु बळी येथे दिला जात नाही. सासरी गेलेल्या मुली यात्रेला माहेरी येतात. येथे मंदिर व परिसरात साफसफाई करून मंडप व आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. हार, प्रसाद, मिठाई, खेळणींची दुकाने परिसरात थाटत आहेत. रहाट पाळणे आलेली आहेत.
येथूनच शिर्डी एमआयडीसीचा रस्ता जात असल्यामुळे तो रुंद व चांगला करण्यात आला आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने भाविक सकाळ संध्याकाळ पायी दर्शनासाठी येथे येत आहेत. सध्या दुष्काळी परिस्थिती आहे पण तरीही भाविकांचा दर्शनासाठी ओघ वाढत आहे. येथे नवरात्र उत्सव यशस्वी होणेकामी श्री भवानी नवरात्र उत्सव कमिटी ट्रस्ट व तरुण मंडळ आणि समस्त सावळीविहीर ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.
0 Comments