श्री.साईंचा श्रद्धा सबुरीचा मंत्र व सबका मालिक एक हा संदेश आज संपूर्ण जगाला ठरत आहे तारक--ह भ प संजयजी महाराज जगताप (भऊरकर)

शिर्डी (प्रतिनिधी)- 
संपूर्ण जगात मानवता हीच एक जात असून सबका मालिक एक हा श्री साईबाबांचा संदेश याची संपूर्ण विश्वाला आज अनुभूती येत आहे ‌जसा वारकरी संप्रदायाचा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा हा मंत्र आहे तसाच जगाला तारणारा श्री साईंनी श्रद्धा सबुरीचा मंत्र दिला आहे. असे मत प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प संजयजी महाराज जगताप (भऊरकर) यांनी शिर्डी येथे साई मंदिरात वरूथिनी एकादशीनिमित्त झालेल्या कीर्तनातून अनेक दृष्टांत, दाखले देत केले. 
ह भ प संजयजी महाराज जगताप यांचे शिर्डी येथे साई समाधी मंदिरामध्ये समोरील स्टेजवर सोमवार 13 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 7 ते 9 या कालावधीत सुश्राव्य असे किर्तन संपन्न झाले. यावेळी कीर्तनातून उपस्थितांना अध्यात्मिक उपदेश करताना हभप संजयजी महाराज जगताप म्हणाले की, या जीवनात यशस्वी व्हायचे असेल , आत्मिक समाधानी व्हायचे असेल तर भगवंताचे नाम चिंतन करणे गरजेचे आहे. नामचिंतन, नामस्मरणाने सर्व जीवन या भवसागरात तरुण जाते. असे सांगत शिर्डी हे जगाच्या पाठीवर एक मोठे पवित्र धाम आहे.साईबाबा सारखे महान संत नव्हे भगवंत यांची ही पावन भूमी आहे. या भूमीतून साईबाबांनी संपूर्ण विश्वाला मानवतेचा संदेश दिला. जसे संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीतून जगाला ज्ञान दिले. तसेच श्री साईंच्या सतचरित्र ग्रंथा मधून मोठे ज्ञान जन माणसाला मिळत आहे. अशा थोर श्री साईबाबांना संत गंगागीर महाराजांनी प्रथम भेटीतच ओळखले होते. व त्याच वेळेस त्यांनी हे महान पुरुष, महान संत असून महारत्न आहे .हा संदेश संपूर्ण शिर्डी ग्रामस्थांना दिला होता. जगात अनेक पदे मिळतात. वेगवेगळ्या प्रकारांनी ती मिळवली जातात. मात्र संत, महंत ही पदे मिळवली जात नाहीत. ती नामस्मरणाने नामचिंतने, ईश्वराशी समरस झाल्यानंतरच आपोआप मिळत असतात. असे सांगत साईबाबांनी येथे रामनवमी, शिवरात्री, गोकुळाष्टमी, असे उत्सव सुरू केले त्यातून ब्रह्मा विष्णू महेश यांची उपासना त्यांनी भक्तांना करायला लावली. संत दासगणू महाराजांना साईबाबांनी पांडुरंगाच्या रूपात दर्शन दिलं. साई हे संत नव्हे भगवंताचे अवतार आहेत.याची संपूर्ण विश्वाला आज त्याची अनुभूती येत आहे. म्हणूनच कोट्यावधी भक्त साईचिंतन ,साईनाम घेतात.व त्यांना तशी अनुभूतीही येते‌.असे सांगत आज सोमवार व एकादशी निमित्त येथे कीर्तनाचा योग आला ही साईंचीच कृपा असल्याचे यावेळी त्यांनी म्हटले. किर्तन संपल्यानंतर साई संस्थांनच्या वतीने व हभप संजयजी महाराज जगताप यांचा साई संस्थांनच्या मंदिर विभागाच्या वतीने पुष्पहार व शाल अर्पण करून सन्मान करण्यात आला. तसेच भाविकांच्या वतीने सचिन घोडेकर, सुनील जपे, राजेंद्र गडकरी यांनी महाराजांचा पुष्पहार घालून यावेळी सत्कार केला. यावेळी श्री ज्ञानेश्वर मंदिर परमहंस आश्रम येथील ह भ प लहू महाराज कराळे तसेच तेथील टाळकरी मुले ,भजनी मंडळ, महिला भजनी मंडळ, चोपदार नवनाथ थोरे ,देशमुख आदींसह वारकरी, साईभक्त यावेळी उपस्थित होते. किर्तना नंतर हभप संजयजी जगताप महाराजांनी श्री साई बाबांच्या समाधीचे व श्री गुरुस्थान मंदिरात जाऊन मनोभावे दर्शन घेतले. श्री साईबाबांच्या दरबारात कीर्तन सेवा तेही एकादशीच्या दिवशी करण्याचा योग आला .श्री साईबाबांचे दर्शन झाले. मनाला खूप समाधान व आत्मिक आनंद मिळाला असे साई दर्शनानंतर ह भ प संजयजी महाराज जगताप यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments