बालसंगोपन निधी देण्याची मंत्री आदिती तटकरेंकडे मागणी, प्रांताधिकाऱ्यांना साऊ एकल समितीचे निवेदन

दिलीप लोखंडे 

टाकळीभान प्रतिनिधी-महिला व बालविकास विभागाच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचे थकीत अनुदान तातडीने अदा करण्याची मागणी साऊ एकल महिला समितीने महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे केली आहे.
समितीचे राज्य समन्वयक मिलिंदकुमार साळवे, श्रीरामपूर तालुका निमंत्रक बाळासाहेब जपे, तालुका समन्वयक मुकुंद टंकसाळे, श्रीकृष्ण बडाख, दिलीप लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी किरण सावंत यांना श्रीरामपूर तालुक्यातील एकल महिलांनी मंत्री तटकरे यांच्या नावे निवेदन दिले.

एकर पालकांच्या मुलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना राबविली जात आहे. या योजनेत राज्यातील एक लाख  ७ हजार बालकांना दरमहा २२५० रुपये अनुदान दिले जाते. शून्य ते अठरा वयोगटातील बालकांच्या  शिक्षणासाठी ही अतिशय चांगली योजना आहे. पण दोन वर्षांपासून या योजनेतील १ लाख ७ हजार विद्यार्थ्यांना दरमहा नियमित पैसे मिळत नाहीत. सरकारकडे पैसे नाहीत, या कारणाखाली गरीब कुटुंबातील या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पैसे दिले जात नाहीत. जून महिन्यात शाळा सुरू झाल्या. पण एकल महिलांना या मुलांसाठी शैक्षणिक साहित्य खरेदी करताना व शैक्षणिक शुल्क भरताना अडचणी येत आहेत. त्यामुळे तातडीने उर्वरित रक्कम विद्यार्थ्यांना द्यावी, अन्यथा या एकल महिला व मुले यांना घेऊन आंदोलन केले जाईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. इथून पुढे दर महिन्याला विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती नियमित खात्यावर जमा करावी. त्याचप्रमाणे अनेक एकल महिलांनी एक किंवा दोन वर्षांपूर्वी अर्ज भरूनही त्यांच्या अर्जांविषयी निर्णय झालेले नाहीत. त्यामुळे राज्यभरातील जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय व जिल्हा बालकल्याण समिती यांच्याकडे प्रलंबित असलेले योजनेचे प्रस्ताव तातडीने मंजूर करून अर्ज दाखल केल्यापासून योजनेचा लाभ देण्यात यावा अशीही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे.
निवेदन देताना साळवे, टंकसाळे, बडाख, लोखंडे यांच्यासह यास्मिन शेख, रुबीना सय्यद, तरन्नुम शेख, समीना जमादार, राजश्री निकम, श्रद्धा बनसोडे, शुभांगी भारस्कर, शालिनी ससाणे, बुशरा शेख, नंदिनी ढोकचौळे, स्वाती कुदळे, लता गांगुर्डे, अश्विनी शेळके मंगल जाधव आदी यावेळी उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments