सद्गुरु नारायणगिरीजी महाराज दिंडी सोहळ्यामध्ये पंढरपूर कडे जात असताना घडले श्री नर्मदेश्वर सेवाधाम, कोल्हार भगवतीचे दर्शन,व साईंचे दर्शन! रस्त्यात अनेक ठिकाणी दिंडीचे जोरदार स्वागत !

राहाता ते  गुहा---( राजकुमार गडकरी)--राहाता येथे श्री नवनाथ मंदिरामध्ये मुक्काम करून पहाटे साडेचारला उठून फ्रेश होऊन येथे मंदिरामध्ये श्री नवनाथांचे  दर्शन घेत पंढरीकडे वाटचाल सुरू झाली. पहाटे अंधार असल्यामुळे मोबाईलचे बॅटरीवर सर्व चालत होते. नगर मनमाड रस्त्याने हळूहळू चालत  पिंपरी निर्मळ शिवारात प्रथम येथील श्री पांडुरंग व श्री गंगागिरी महाराज व श्री नारायण गिरीजी महाराज मंदिरात जाऊन तेथील या मूर्तींचे दर्शन घेतले. 
नंतर थोडे पुढे नगर मनमाड रस्त्याच्या पश्चिमेला असणाऱ्या श्री नर्मदेश्वर मंदिरात आम्ही गेलो.तेथे प्रसन्न व अध्यात्मिक असे वातावरण पाहून आनंद वाटला.तेथे असलेल्या मंदिरात श्री पांडुरंगाचे तसेच श्रीपाद बाबांचे दर्शन घेतले. जवळच असणाऱ्या श्री नर्मदेश्वर महादेवाचे दर्शन घेतले. तसेच होमकुंड व गावरान गाईचे दर्शन घेत तेथे आईसाहेब यांचे दर्शन घेतले. आग्रहाखातर तेथे कोरा चहा घेतला. मंहत आत्माराम गिरीजी महाराज हे मुंबईला गेले असल्यामुळे त्यांच्याशी मोबाईलवर चर्चा करून त्यांचे आशीर्वाद घेत.
 आम्ही पिंपरी निर्मळगावा कडे चालू लागलो. पिंपरी निर्मळ गावामध्ये गोरक्षनाथ घोरपडे यांच्या तर्फे चहा झाला.गोरक्षनाथ घोरपडे, भाऊसाहेब पवार,पिंपरी निर्मळ यांच्याकडून चहा पाणी झाला. नंतर दिंडी पुढे बाभळेश्वरला आल्यानंतर येथे-पुनम मशिनरी स्टोअर्स , श्रीमान राजू भाई पटेल यांच्याकडून सर्वांना फरसाण पुडे प्रसाद म्हणून देण्यात आले. येथे पूनम मशनरी स्टोअर चे मालक यांचा दिंडीतर्फे सत्कार करण्यात आला.येथे पुनम मशनरी स्टोअर्स कडून शेव पाकीट प्रसाद आम्हाला सर्वांना मोठ्या मनोभावाने आदरतिथ्य करत दिला गेला .तिथून पांडुरंगाचा जयजयकार करत व त्यांचा सन्मान आदर करत दिंडी पुढे मार्गक्रमण करत हळूहळू पाटाच्या पुढे बोडखे कॉम्प्लेक्स जवळ आली असता तेथे मित्र पत्रकार विजय बोडखे यांचे चिरंजीव सुरज बोडके यांच्याशी थोड्यावेळ धार्मिक गप्पा झाल्या.नंतर दिंडी कोल्हार गावात दुपारी आल्यानंतर येथे साहेबराव शेलार यांच्याकडेही दरवर्षीप्रमाणे यंदाही येथील वारकरी कुटुंबाच्या आग्रहास्तव चहा बिस्किट झाले.नंतर अनेकांनी कोल्हार येथील प्रसिद्ध श्री भगवती मातेच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर प्रवरा नदीच्या किनारी असणाऱ्या पुलाजवळील भव्य दिव्य अशा सुंदर बांधकाम असणाऱ्या श्री महादेवाच्या मंदिरात जाऊन अनेक जण नतमस्तक होऊन तेथे अनेक देवतांचे व शनि महाराजांचे दर्शन घेतले.नंतर प्रवरानदीचा कोल्हार येथील पूल पार करून कोल्हार खुर्द येथील ह भ प गोविंदराव बाबुराव शिरसाट यांच्या घरी दुपारी पोहचल्यावर तेथे दिंडीचे जोरदार स्वागत झाल्यानंतर तेथे अर्धा तास भजन केले. नंतर त्यांनी दिलेल्या आमटी भाकरी लापशी  या महाप्रसादाचे सेवन केले.तेथे  शिरसाट परिवारांचा सत्कार करण्यात आला.व दिंडी परत रस्त्याला लागली. नगर मनमाड रस्त्याच्या कडेलाच पूर्वमुखी असे श्री साईबाबांचे सुंदर मंदिर आहे. येथे श्री साईबाबांची सुंदर अशी बसलेली आकर्षक मूर्ती आहे. तेथे साईबाबांची सर्वांनी दर्शन घेतले. थोडा आराम केला. शिर्डी माझे पंढरपुर! साईबाबा रमावर!शुद्ध भक्ती चंद्रभागा !भाव पुंडलिक जागा ! ही आरती तेथे म्हणत सर्वांनी पंढरपूरची वारी सुखरूप व्हावी म्हणून सद्गुरु साईचरणी  तेथे प्रार्थना केली.व पुढे दिंडी मार्गस्थ झाली.यंदा पाऊस अगोदर झालेला असल्यामुळे सर्वत्र रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवा गार असा परिसर आकर्षक असा वाटत होता. कधी आकाशात अचानक ढग भरून येत होते. अनेक जण गात चालत आनंद घेत पांडुरंगाचा गजर करत एकेक पावले टाकीत होते. सायंकाळी गुहा येथील ज्ञानेश्वर श्रीपतराव कोळसे पाटील व परिवार यांच्या वस्तीवर सायंकाळी मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचली. राहता ते गुहा असे सुमारे 32 ते 33 किलोमीटर आंतर आज सर्वांनी पायी चालून कापले होते.तरीसर्वजण फ्रेश होऊन कोळसे पाटील यांच्या बंगल्यासमोर सर्वांनी गळ्यात टाळ घालून व मोठ्या भक्ती भावात हरिपाठ, भजन  झाले.व कोळसे पाटील यांनी  आरती केली. साधारण तासभर चाललेल्या या धार्मिक कार्यक्रमामुळे दिवसभराचा थकवा आपोआप नाहीसा झाल्यासारखा वाटला. सर्वजण प्रसन्न दिसत होते. त्यानंतर कोळसे पाटील यांनी दिंडीतील सर्व वारकऱ्यांना महाप्रसादाची मिष्टांन्न जेवणाची पंगत दिली. सर्वांनी परत एकदा बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम म्हणत या महाप्रसादाचा पंक्तीमध्ये बसून आस्वाद घेतला. येथे जेवण करून सर्वांनी तासभर गप्पा मारत रात्री आपल्या वाहनातून पिशव्या काढत त्यातील पथारी आंथरत पांडुरंगाचे नाव घेत सर्वजण शांतपणे झोपी गेले. असा हा दिंडीचा एक एक दिवस मोठ्या आनंदात व सर्वांशी अनेक दिवसातून भेटी झाल्यामुळे एकमेकांची खुशाली विचारपूस करत आणि त्यातच हरिनामाचा नामाचा गजर करत जात होता . दिंडीतील पायी चालण्याचे ही सुरुवातीचे दिवस असल्याने काही थोडेसे पायी चालून थकले होते. मात्र पंढरीकडे जाण्याची उत्सुकता मोठी असल्यामुळे काही वाटत नव्हते.त्यामुळे येथे रात्री जेवण झाल्यानंतर रात्री झोप कधी लागली हेही समजले नाही. जय हरी!

Post a Comment

0 Comments