कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांची उन्हाळी सुट्टी महाविद्यालयातच (इ.११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया जोमात शिक्षक मात्र कोमात)



लोहगाव (वार्ताहर)

शैक्षणिक वर्ष सरताच सर्व परीक्षा आटोपल्या की विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांनाही सुट्टीची चाहूल लागते. उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे शिक्षकांसाठीचा श्रमपरिहार असतो. उन्हाची लाहीलाही, दगदग आणि वर्षभरातील लांबणीवर पडलेल्या विविध कामांची पूर्तता, मुलांचे शैक्षणिक प्रवेश पूर्ण करण्याची हीच ती वेळ असते; परंतु यावर्षी दहावी व बारावी शालांत परीक्षा दहा दिवस अलीकडे आल्यामुळे दहावी आणि बारावीचे निकाल शिक्षकांच्या ऐन सुट्टीच्या कालावधीत लागली आहेत.

 त्यामुळे यंदा शिक्षकांच्या सुट्टीचे तीन तेरा वाजले आहेत. सुट्टी बुडत असल्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर निर्माण झाला आहे. 
ऐन मेच्या सुट्टीत ५ मे रोजी बारावी परीक्षेचा निकाल लागल्यामुळे विद्यार्थ्यांचा ऑनलाईन निकाल काढून पेपरवर घेणे, विद्यार्थ्यांना निकाल पत्रकाचे व दाखल्यांचे वाटप करणे, रिपीटर विद्यार्थ्यांचे पुरवणी परीक्षेसाठी फॉर्म भरून घेणे यासाठी शिक्षकांना वेळ द्यावा लागला आहे. यंदाची दहावी बारावीची पुरवणी प्रात्यक्षिक परीक्षा ११  जूनपासून तर लेखी परीक्षा २४ जून पासून दरवर्षीपेक्षा खूपच अलीकडे व लवकर सुरू होत आहे. याचाही परिणाम शिक्षकांच्या सुट्टीवर होणार आहे. 
राज्यात मेट्रो सिटी पाठोपाठ इ. ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया शासन आणि शालेय शिक्षण विभागाच्या अट्टहासामुळे ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयांपर्यंत सक्तीची करण्यात आली आहे. या प्रक्रियेची पूर्वतयारी शिक्षण उपसंचालक आणि जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्या स्तरावरून शिक्षकांना मेच्या सुट्टीत प्रत्यक्ष मार्गदर्शन बैठका, पडताळणी शिबिरे व दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन बैठका सुट्टीतच २ मे पासून सुरू झाली आहेत. मेच्या पहिल्या आठवड्यात सुरू झालेले हे प्रवेश प्रक्रियेचे कामकाज ऑगस्ट अखेरपर्यंत सुरू राहणार आहे. ऑनलाईन सॉफ्टवेअरच्या माध्यमातून नगर, पुणे येथील व इतर विभागातील पडताळणी शिबिरातून राज्यातील सर्व महाविद्यालयांना आपली महाविद्यालयाची मूळ मान्यता, तुकडी मान्यता, अतिरिक्त तुकड्या मान्यता, विषय मान्यता तपासून घेऊन सविस्तर आवश्यक त्या माहितीसह शालेय शिक्षण विभागाच्या mahafyjcadmissions.in या वेबसाईटवर अपलोड आणि पूर्तता करण्यात शिक्षकांचे बरेच श्रम पडले आहेत. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या वेळापत्रकानुसार दि.१९ ते २६ मे या कालावधीसाठी विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनसाठी वेळ देण्यात आला होता; परंतु ही ऑनलाईन वेबसाईट काही तांत्रिक अडचणीमुळे योग्य तऱ्हेने सुरू होऊ शकली नाही. त्यामुळे विद्यार्थी, पालकांसह सर्वच शिक्षकांची धावपळ उडाली. १६ मे रोजी इयत्ता दहावीचा निकाल लागला, त्यातच वेबसाईटची अडचण यामुळे विद्यार्थी व पालकांसह शिक्षकांनाही मनस्ताप सहन करावा लागला आहे.
ऑफलाईन की ऑनलाईन ? या चक्रात अडकलेल्या या प्रवेश प्रक्रियेत पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांची त्रेधा उडाली. या सर्व प्रक्रियेत राज्यात अनुदानित व्यतिरिक्त इतर प्रकारच्या महाविद्यालयांची संख्या अधिक आहे. त्या तुलनेत राज्यात विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयात यावर्षी राज्यभर प्रचंड जाहिरातबाजी होऊन मुलांची ओढाओढ सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अथवा फोनच्या माध्यमातून संपर्क करावे लागले आहेत. काही महाविद्यालयांच्या परिसरात शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन प्रवेशासाठी पालकांची मनधरणी, विनंती करावी लागत आहे. प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयात आपली विद्यार्थी संख्या पूर्ण होण्यासाठीची ही चढाओढ आणि विद्यार्थी मिळविण्यासाठीची स्पर्धा, शर्यत आणि प्रवेश प्रक्रिया हा कर्तव्याचा भाग असल्यामुळे शिक्षकांना सुट्टीवर मात करून महाविद्यालयातच उपस्थित राहून प्रवेश पूर्ण करण्याशिवाय पर्यायच शिल्लक राहिला नाही.
 त्यातच अल्पशा अडचणीच्या विश्रांतीनंतर ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पुन्हा २६ मे पासून नव्या जोमाने सुरू होत आहे. प्रवेश प्रक्रिया जोमात आणि  विद्यार्थी, पालक व शिक्षक मात्र कोमात, अशी ही अवस्था झाली आहे. विद्यार्थ्यांना महाविद्यालयात उपस्थित राहून सर्व ऑनलाईन प्रवेश फॉर्म समक्ष भरून द्यावी लागणार आहेत. यासाठी हे फॉर्म भरून घेण्याचे व फॉर्म व्हेरिफाय करण्याचे काम शिक्षकांना महाविद्यालयात उपस्थित राहून करावे लागणार आहे. शिक्षकांना विद्यार्थ्यांची सविस्तर माहिती अपलोड करावी लागणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी शिक्षकांना १५ ते २० मिनिटे फॉर्म भरण्यासाठी द्यावी लागणार आहेत. याशिवाय ही प्रक्रिया चार मुख्य फेऱ्यांसह शेवटी सर्वांसाठी खुल्या फेरीपर्यंत जुलै अखेर पूर्ण करावयाची आहे. त्यानंतर ११ ऑगस्ट दरम्यान अथवा तत्पूर्वी विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष वर्ग सुरू होणार आहेत. या प्रदीर्घ कामासाठी शिक्षकांना पूर्णतः वेळ द्यावा लागणार आहे. 
त्यातच एकीकडे काही महाविद्यालयांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रशिक्षण सुरू आहेत तर दुसरीकडे दोन वर्षांपासून वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रशिक्षण झालेले नाही. त्यामुळे मास्टर प्रशिक्षण दि. २६ ते २९ मे आणि प्रशिक्षणार्थी यांचे प्रशिक्षण यावर्षी ऐन सुट्टीत दि. २ जून ते १२ जून या कालावधीत सुरू होणार आहे. सदर प्रशिक्षणासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील २१४३ शिक्षकांनी ऑनलाईन नोंदणी केल्यामुळे हे प्रशिक्षण तालुकास्तरावर घेण्याचे निश्चित झाले आहे. 
काही संस्था पातळीवर सालाबादाप्रमाणे इयत्ता बारावीचे उन्हाळी वर्ग २ जून पासून सुरू होत आहेत, शिक्षकांना अध्यापन कार्यासह ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेवर लक्ष ठेवून ही प्रक्रिया पूर्ण करण्यामध्ये गुंतून राहावे लागणार आहे. त्यामुळे यंदा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा सुट्टीतील मुक्काम हा कनिष्ठ महाविद्यालयातच असल्यामुळे नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्य व टप्पा अनुदानावर असलेल्या शिक्षकांना सुट्टीच्या कालावधीत पगार मिळत नसल्यामुळे या सर्वच शिक्षकांना सुट्टीमध्ये विनामोबदला अथवा कमी मानधनावर काम करावे लागत आहे. लमसम आणि तासिका तत्त्वावरील शिक्षकांची यात मोठी आर्थिक कुचंबना होत आहे. कनिष्ठ महाविद्यालयीन विविध संघटना व शासन स्तरावर पुढील वर्षी या बाबींचा विचार व्हावा, अशीही चर्चा सुरू आहे.

Post a Comment

0 Comments