दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.08- पाण्याचा शोधात जंगलातून शेती शिवारात बापू पाटील यांच्या ग.नं.155 मध्ये असलेल्या शेतातील विहिरीत वानर पडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. दरम्यान मृत वानरास दुपारी एक वाजता विहिरी बाहेर काढून ग्रामस्थांनी दुपारी अडीच वाजता मृत वानरावर अंत्यसंस्कार केले. सात दिवसांचा दुखवटा देखील ग्रामस्थ पाळणार आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी,पाण्याच्या शोधात शेती शिवाराकडे बापू पाटील यांच्या शेतातील विहिरीत वानर पडले होते. बापू पाटील यांच्या शेतातील शेतमजूर सर्जेराव पवार हे विहिरी जवळ गेले असता त्यांना विहिरीत मृत वानर आढळून आले.त्यानंतर त्यांनी गावातील समाधान श्रीपाद बावस्कर, अन्वर तडवी, गजानन पाटील, भाऊसाहेब भालेराव, राहुल उगले,आप्पा वाघ यांना बोलावून मृत वानरास विहिरी बाहेर काढून मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास वानराची पूजा करीत अंत्यसंस्कार करण्यात आले.वानराच्या अंत्यसंस्कारानंतर ग्रामस्थ सात दिवसांचा दुखवटा पाळणार असून गंधमुक्तीचा कार्यक्रम बारा एप्रिलला होणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
उन्हाची तीव्रता वाढली असून अशा परिस्थितीत जंगलातील नैसर्गिक पाण्याचे स्रोत कोरडेठाक पडले आहेत. जोगेश्वरी देवी जंगलातील पाणवठ्यांमध्ये वन्यजीव विभागाने कृत्रिम पाणवठ्यांमध्ये टँकरने पाणी टाकून वन्यप्राण्यांची तहान भागवण्याची मागणी होत आहे. जंगलांमध्येही अशा प्रकारचे कृत्रिम पाणवठे निर्माण करून त्यात प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी निसर्गप्रेमी सर्जेराव पवार यांनी केली आहे.
(ऑनलाईन नेटवर्क डिजीटल मिडिया सहयोगी बातमीदार दिलीप शिंदे सोयगाव यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.)
0 Comments