शिर्डी (राजकुमार गडकरी)
अहिल्यानगर, पुणे व ठाणे या तीन जिल्ह्यांच्या सरहद्दीलगत असलेला आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात येणारा एक प्रसिद्ध असा निसर्गरम्य व पुरातन डोंगरी किल्ला व धार्मिक क्षेत्र असणारा हरिश्चंद्रगड असून हा किल्ला अहमदनगरपासून १२५ किमी.
अंतरावर व अकोले तालुक्यात पाचनई जवळ आहे . समुद्रसपाटीपासून ४६९१ फूट उंचीवर आहे. सह्याद्रीच्या रांगेत कळसुबाई शिखराच्या काही किलोमीटर अंतरावर हरिश्चंद्रगड येतो.या किल्ल्यावर येण्यासाठी अनेक मार्ग असून तोलारखिंडीच्या व पाचनईकडून येणाऱ्या वाटेचा पर्यटक जास्त उपयोग करतात. पुण्याहून आळेफाटा आणि पुढे खुबी फाट्यावरून खिरेश्वर मार्गे गडावर जाता येते. पाचनई मार्ग हा सर्वांत सोपा मार्ग असून या वाटेवर किल्ल्याच्या तटबंदीचे अवशेष दिसतात. खुबी फाटामार्गे किल्ल्यावर जाताना वाटेतील खिरेश्वर गावात यादवकाळातील ‘नागेश्वराचे’ प्राचीन मंदिर दिसून येते.तसेच कोथळा मार्गे ही या गडावर जाता येते.
तोलारखिंडीतून वर चढून गेल्यावर डाव्या हाताला असणाऱ्या टेकडीवर हरिश्चंद्रगडाचा तटबंदीयुक्त बालेकिल्ला आहे. बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार उद्ध्वस्त स्थितीत असून माथ्यावर अनेक लहान-मोठ्या घरांच्या जोत्यांचे अवशेष, दोन पाण्याची टाकी व काही गुहा आढळतात. या गुहांचा वापर कोठार म्हणून केला जात असे. याच्या बरोबर खालच्या बाजूस दक्षिणेस किल्ल्याचा मुख्य जुन्नर दरवाजा असून या मार्गे येणारी वाट दरड पडल्यामुळे आणि वापरात नसल्याने दुर्लक्षित झाली आहे. दरवाजा उद्ध्वस्त स्वरूपात आहे. किल्ल्याच्या माथ्यावरून कळसुबाई, रतनगड, आजोबा, घनचक्कर, भैरवगड, कुलंग, अलंग, मदन असा उत्तरेकडील, तर माळशेज घाट, भैरवगड, नानाचा अंगठा, जीवधन यांपर्यंतचा दक्षिण- पश्चिमेकडील भाग दृष्टिक्षेपात येतो.किल्ल्याच्या सर्वोच्च माथा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तारामती शिखराच्या खालील बाजूस खडकात कोरलेल्या आठ-नऊ लेण्या आहेत. यातील एका गुहेच्या द्वारपट्टीवर शिव आणि गणपतीच्या मूर्ती कोरलेल्या असून गुहेत असणाऱ्या शिलालेखावरून या गुहा दहाव्या–अकराव्या शतकात कोरलेल्या असाव्यात, तसेच येथील लेणी हिंदू लेणी असावीत, असे अभ्यासकांचे मत आहे. या लेणी समूहातील एक अर्धवट कोरलेल्या गुहेत सहा फूट उंचीची गणपतीची महाकाय मूर्ती कोरलेली आहे. या लेण्यांच्या थोडे खाली उत्तरेला एक कुंड असून त्याला ‘सप्ततीर्थ’ म्हणून ओळखले जाते. कुंडांत चौदा देवळ्या असून त्यात विष्णुमूर्ती ठेवलेल्या होत्या. यांतील काही विष्णुमूर्ती आज अस्तित्वात नसून उरलेल्या मंदिरामागील गुहेमधे ठेवलेल्या आहेत. कुंडासमोर ‘काशीतीर्थ’ नावाने ओळखले जाणारे एक छोटे मंदिर आहे. मंदिरासमोर काही अपूर्ण शिल्प आहेत. कुंडाच्या पश्चिमेला ‘हरिश्चंद्रेश्वराचे’ हेमाडपंती बांधणीतील वैशिष्ट्यपूर्ण शिवमंदिर असून पंचावन्न ते साठ फूट उंचीच्या मंदिराच्या पायऱ्यायुक्त कळसापर्यंत आकर्षक व शैलीदार कोरीव काम केलेले आहे. मंदिराला प्रासाद व त्यामध्ये जाण्यासाठी पूर्व व पश्चिम अशा दोन बाजूंनी प्रवेशद्वारे आहेत. मंदिराच्या दक्षिणेकडील बाजूस कोरीव गणेशमूर्ती असून, मूर्तीच्या वरील बाजूस देवनागरी लिपीत शिलालेख कोरलेला आहे. बांधीव मंदिराच्या प्रांगणाला बंदिस्त भिंत आहे. मंदिराच्या पश्चिमेस दोन गुहा असून त्यांतील एका गुहेच्या तळघरात योगी चांगदेव महाराज तपश्चर्येला बसत असल्याचे सांगितले जाते. गुहेलगत पाण्याची दोन टाकी आहेत. सांप्रत मंदिराच्या प्राकाराची भिंत व मंदिराच्या पश्चिम बाजूची बरीच पडझड झालेली आहे. मंदिराच्या उत्तरेला थोडे खालील बाजूस ‘केदारेश्वराचे लेणे’ म्हणून ओळखली जाणारी भव्य गुंफा असून आतील पाण्यातील चौथऱ्यावर भव्य शिवलिंग आहे. चौथऱ्याच्या चार कोपऱ्यांवर छताला आधार देणारे खांब असून त्यांपैकी तीन खांब तुटलेले आहेत. गडावर इतिहासाची साक्ष देणारे आठ शिलालेख आहेत. या भव्य दहा ते बारा फुटी शिवलिंगाच्या सर्व बाजूंनी थंडगार पाणी आहे या पाण्यामध्ये भाविक स्नान करून प्रदक्षिणा मारतात. महाशिवरात्रीच्या दिवशी हरिचंद्र गडावर मोठी यात्रा भरते. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. महाशिवरात्र यात्रा काळात गडावर चहापाण्याची व जेवणाची सोय असते. उपवासाचे फराळ येथे मिळते पावसाळ्यात या गडाचे सौदर्य काही औरच असते. वनस्पतींची विविधता या गडाएवढी इतरत्र कुठेही आढळणार नाही. हरिश्चंद्र अभयारण्य म्हणून घोषित या गडावर अनेक दाट झाडी असून करवंद, कारवीच्या जाळी , धायटी , उक्षी, मदवेल, कुडा, पांगळी, हेकळ, पानफुटी, गारवेल इत्यादी वनस्पती येथे आढळतात. या भागातील प्राणिवैभव मात्र शिकारींमुळे बरेच कमी झाले आहे. तरीही कोल्हे, तरस, रानडुकरे, बिबळ्या, ससे, भेकर, रानमांजरे इत्यादी प्राणी आढळतात. उन्हाळ्यामध्ये गडावर चढताना उतरताना हिरवीगार गर्द झाडी व त्यामध्ये लाल गुलाबी उमलेले फुलांचे वृक्ष सर्वांनाच आकर्षित करून घेत असतात. फुलांचा वृक्षांचा गडावर अतिशय सुगंध दरवळत असतो. महाशिवरात्रीच्या आदल्या दिवसापासून भाविक गड चढण्यास सुरुवात करतात रात्रभर गडावर शेकोट्या करून जागतात. रात्री बारा वाजेपासून स्नान करून दर्शन घेण्यास सुरुवात करतात. श्रीहरीचंद्रेश्वराचे दर्शन झाल्यानंतर अनेक जण या गडावरील कोकणकडा पाहण्यास जातात.
हरिश्चंद्रगडाचा उल्लेख प्राचीन अग्निपुराणात व मत्स्यपुराणात आढळतो.
हरिश्चंद्र, तारामती आणि रोहिदास अशी येथील शिखरांची नावे असल्यामुळे या किल्ल्याचा संदर्भ थेट राजा हरिश्चंद्रापर्यंत स्थानिक दंतकथांनी जोडला आहे. हरिश्चंद्रगडावरील लेण्यांत चांगदेवांनी तपश्चर्या केली होती. असे म्हटले जाते.
गडाच्या पश्चिमेकडे असलेला कोकणकडा हे या किल्ल्याचे सर्वांत मोठे आकर्षण आहे. तीन हजार फूट खाली कोकणात कोसळणारा हा कडा मध्यभागी जवळजवळ ७५ फूट अंतर्वक्र आहे. कड्याच्या माथ्यावर झोपूनच याचे विराट रूप पहावे लागते. स्वच्छ हवा असली तर येथून कल्याणपर्यंतचा प्रदेश दिसतो. येथे नाणे खाली फेकले कि ते हवेच्या दाबाने वर येते. हा कडा महाराष्ट्रातील सर्वांत उंच कडा आहे. हा कडा रोमन लिपीतील यू 'U' या अक्षराच्या आकाराचा आहे. हा इतर कड्यांसारखा ९० अंशात नसून अंतर्गोल आकाराचा आहे. समोरून बघितला तर नागाच्या फण्यासारखा दिसतो. निसर्गाची मुक्त उधळण, त्याचे रौद्रत्व, निसर्गाचे वेगवेगळे आविष्कार आपल्याला हरिश्चंद्रागडावर पहायला मिळतात.
या शिखरावरून जंगल, घाटावरचा आणि कोकणातील प्रदेश न्याहाळता येतात. तारामती शिखरावर जाताना वाटेत अनेक गोमुखे लागतात. माथ्यावर दोन-तीन शिवलिंगे आहेत. येथे रोहिदास शिखरही आहे.
महाराष्ट्रातील इतर पारंपरिक किल्ल्यांपासून हा किल्ला वेगळा आहे. इतर किल्ल्यांमध्ये आढळणारी तटबंदी येथे दिसत नाही.
या किल्ल्यावर प्राचीन लेणी आहेत. तसेच सुमारे १२व्या शतकापेक्षा जुने शालिवाहन काळातील शिवमंदिर आहे. सह्याद्रीतील अत्यंत दुर्गम किल्ला म्हणून याची ओळख आहे.
मंदिराच्या प्रांगणात प्राकाराची भिंत आहे. या प्राकाराच्या भिंतीसमोरच एक दगडी पूल आहे. या पुलाच्या खालून एक ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो, ज्याला 'मंगळगंगेचा उगम' असेही म्हणतात. पुढे ही नदी पायथ्याच्या पाचनई गावातून वाहत जाते. तसेच गडाच्या दक्षिण बाजूने पुष्पावती व काळु या नद्यांचा उगम होतो. मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत. काही गुहा राहण्यासाठी योग्य आहेत तर काही गुहांमध्ये पाणी आहे. या गुहांमधील पाणी थंडगार आहे. महाशिवरात्रीला येथे यात्रा भरते. जिल्ह्यातून राज्यातून येथे मोठ्या संख्येनेभाविक दर्शनाला येतात. महाशिवरात्रीला श्री हरिहरेश्वराचे दर्शन घेऊन मन समाधानी होतात. हरिचंद्र गड हा पर्यटन धार्मिक ऐतिहासिक निसर्गरम्य, कडे, कपारी, जंगल ,असा व विविध पशुपक्षी, विविध फळ फुले व औषधी वनस्पतींनी व्यापलेला असा आहे. म्हणूनच येथे एकदा तरी भेट देऊन या निसर्गरम्य हरिश्चंद्रगडाचा आनंद, अनुभव घ्यावा.
0 Comments