तालुक्यातील लाभार्थ्यांना हस्तांतरण योजनेमार्फत लाभ देण्यास सुरूवात - तहसीलदार पाटील




 राहुरी / प्रतिनिधी :  तालुक्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या शासकीय योजनेतील लाभार्थ्यांना थेट हस्तांतरण योजनेमार्फत (डीबीटी) लाभ देण्यास सुरूवात करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार नामदेव पाटील यांनी दिली आहे. 


  यासंदर्भात आधिक माहिती देताना त्यांनी म्हटले आहे की, विशेष सहाय्य कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येत असलेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेमधील वयोवृध्द, दुर्धर आजारी, दिव्यांग, परितक्ता व विधवा महिला अशा पात्र लाभार्थ्यांना मिळणारे अर्थसहाय्य तहसील कार्यालयामार्फत लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येत होते.
  लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण जलदगतीने करणे व नागरीकांना मिळणा-या सेवा जास्त सुलभ करण्याच्या दृष्टीने प्रचलित कामकाज पध्दतीचे पुनर्विलोकन करुन प्रशासकिय कार्यपध्दतीमध्ये सेवा अतिशय सुलभ पध्दतीने देऊन नागरीकांचे जीवन सुकर व्हावे याकरीता शासनामार्फत योजनांचा लाभ डी.बी.टी. पोर्टलव्दारे करण्याबाबत शासनस्तरावरुन निर्देश देण्यात आलेले आहेत.
त्यानुसार संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी. बी. टी. व्दारे माहे डिसेंबर २०२४ पासुन करण्यात आले आहे. हे अनुदान चालु महिन्यात थेट हस्तांतरण योजनेव्दारे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले आहे. याकरीता संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील सर्व लाभार्थ्यांची, या योजनेकरिता उघडण्यात आलेली बॅंक खाती ही आधारकार्ड व मोबाईल नंबरशी संलग्न (लिंक) करणे आवश्यक आहे. त्यासाठी ज्या लाभार्थ्यांची खाती आधारकार्ड व मोबाईल क्रमांकशी संलग्न नाही, त्यांनी त्वरीत आपल्या बँकेत जावुन बैंक खाती आधारकार्ड व मोबाईल क्रमांकशी संलग्न करुन घ्यावेत. ज्यांचे बॅंक  खाती आधार नंबर व मोबाईल नंबरशी संलग्न (लिंक) नाही, त्यांचे या योजनेअंतर्गत प्राप्त होणारा लाभ हा माहे फेब्रुवारी २०२५ नंतर बंद होणार आहे.
त्याचप्रमाणे डिसेंबर २०२४ चा लाभ हा डिबीटी (थेट हस्तांतरण योजनेव्दारे) लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेला आहे. परंतु ज्या लाभार्थ्यांच्या खात्यावर डिसेबर २०२४ चा लाभ प्राप्त झालेला नाही, अश्या लाभार्थ्यांनी आधारकार्ड व मोबाईल क्रमांक घेऊन बैंकेत जावुन एन पी सी एल मॅपींग करुन घ्यावेत. एनपीसीएल मॅपींग केल्यानंतर अशा लाभार्थ्यांनी तहसील कार्यालय राहुरी येथे तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार श्री. नामदेव पाटील, यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments