दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.23 - सोयगाव तालुक्यातील अजिंठा वनपरिक्षेत्रा अंतर्गत अवैधरित्या वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जात असून कत्तल केलेल्या लाकडांचा विटभट्ट्यांमध्ये सर्रास वापर केला जात आहे.
याबाबत अजिंठा वनविभागाचे फरदापुर राऊंडचे वनपाल एच.एच. सय्यद यांना सोशल मीडियाद्वारे माहिती देऊनही धनवट व परिसरासह ठाणा येथील वीट भट्टी धारकांवर कोणतीही कार्यवाही केली नाही. अजिंठा वनविभागाचे व लाकूड तस्करांचे आर्थिक हित संबंधातून कारवाई केली जात नसल्याची चर्चा जागरूक नागरिकांसह वृक्षप्रेमी मधून केली जात आहे. वनविभागाच्या या अनागोंदी कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.
वृक्ष संवर्धनासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करीत आहेत. सामाजिक संघटना,वृक्षप्रेमी वृक्षारोपणासाठी जनजागृती करीत आहे. मात्र लाकूड तस्करांकडून सोयगाव व अजिंठा वनपरिक्षेत्रात अवैधरीत्या सर्रास डेरेदार वृक्षांची कत्तल केली जात आहे. सोयगाव तालुक्यातील अजिंठा वनपरिक्षेत्र अंतर्गत धनवट,ठाणा परिसरात जवळपास दहा ते पंधरा वीट भट्ट्या असून या वीट भट्ट्यांमध्ये सर्रास लाकडांचा वापर केला जात आहे याबाबत अजिंठा वनविभागाचे फरदापुर राऊंडचे कर्मचारी यांना सोशल मीडियाद्वारे माहिती देऊनही कार्यवाही केली जात नाही. मागील वर्षी अजिंठा वनपरिक्षेत्राचे तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी सोनवणे यांनी धनवट येथील वीट भट्ट्या धारकांवर केलेल्या कार्यवाहीची माहिती आरटीआय अंतर्गत मागितली असता पत्र व्यवहाराचा फार्स करीत माहिती दडण्यात आली. त्यामुळे वीट भट्ट्यांमध्ये लाकडांचा सर्रास वापर केला जात दररोज अजिंठा वनपरिक्षेत्रातर्गत तीन ते चार लाकडाने भरलेल्या गाड्या खाली होत आहे.यामुळे वृक्षांची कत्तली चे प्रमाण वाढले आहे. रस्त्यालगत असलेल्या विटभट्ट्यांमध्ये लाकडांचा होत असलेल्या वापरामुळे रस्त्याने ये-जा करणारे दुचाकीस्वार, मजूर, वाहन धारक यांना वीट भट्ट्यांच्या प्रदूषणामुळे त्रास होत आहे तर धनवट गावातील नागरिकांचे आरोग्य सुध्दा धोक्यात आले आहे. वीट भट्ट्यांमध्ये लाकडांच्या वापरावर अजिंठा वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी काय कारवाई करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
0 Comments