दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.०९ -- अजिंठा डोंगर हा दांडकारण्याचा भाग होता. खुप घनदाट अरण्य या भागात, मात्र मानवी अतिक्रमण, वाढते नागरिकी करण, बेसुमार वृक्ष तोड, वनवा, तस्करी मानवी हव्यास यामुळे हा सातमाळ अर्थात अजिंठा डोंगर बोडका करण्याचा घाट अनेक वर्षांपासून सुरु आहे. अनेक जखमा घेवून टाहो फोडणारा निसर्ग,इथली माती, झाडे, वन्यजीव, पक्षी,वृक्षांच्या पानातून अन मनातून येणाऱ्या वेदनामय आवाजाची साद ऐकली एका माणसाच्या डॉक्टरने आणी त्याच्यात लपलेल्या पर्यावरण प्रेमीने. जागतिक तापमान वाढ, सर्वत्र होणारी बेसूमार वृक्ष तोड,पर्यावरणाचा ऱ्हास, अजिंठा डोंगरातील वन्यजीवांची तस्करी, नामशेष होत जाणाऱ्या वनस्पती व जैवविविधतेतील दुवे याकडे जगाचे लक्ष वेधून त्यांच्या संवर्धनासाठी अहोरात्र परिश्रम घेणारे एक नाव म्हणजे छ. संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड येथील अभिनव प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. संतोष पाटील.
आपला स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय सांभाळत रोज तीन तास वृक्षारोपण,निसर्ग सेवा,वृक्ष संवर्धन, जखमी पक्षी व वन्यजीवांना वाचविणे यासाठी जीवन अर्पण केलेले हे व्यक्तिमत्व. भारतीय संस्कृती व वृक्ष यांचे एक नाते आहे. विविध सणवार यात एकतरी देशी झाड पूजनीय असते. हाच धागा पकडून डॉ. संतोष पाटील यांनी वृक्षारोपण व संस्कृती यांची सांगड घालत हरितवारी हा उपक्रम संपूर्ण राज्यभर राबवत ५०० हुन अधिक झाडे या एकाच वर्षात लावून वाढविली. हरितवारीची राज्यभर चर्चा ही झाली. वारकरी संप्रदायात महत्व असलेल्या कान्होपात्रा वेल, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या शी संबंधित सुवर्ण पिंपळ,अजानवृक्ष तुकोबाराय यांच्या जीवनात महत्व असलेला नांद्रुक,भगवान शंकर यांच्या शी संबंधित शमी,बेल,नागकेशर,भगवान श्रीकृष्ण यांसी संबंधित कदंब,भगवान रामासी संबंधित सीतापत्र,हिंदू संस्कृतीत पूजनीय असलेले वड, उंबर, पिंपळ, निम, आदी जैववीवीधता उपयोगी १० हजार झाडे १४ वर्षात या अवलिया हरित वारकऱ्याने विविध मंदिर, शाळा, कॉलेज,शेत कऱ्यांच्या बांधावर,रस्त्याच्या बाजूला,विविध गावात लावून, त्यांचे पालकत्व देवून जगवली व वाढवली आहेत.सिल्लोड तालुक्यातील बहुली हे गाव आरोग्य सेवेसाठी आधी दत्तक घेतले मग त्या गावास निसर्ग रक्षणासाठी प्रेरीत करून राज्यातील इको विलेज - पर्यावरण गाव बनविण्यास १० वर्षांपूर्वी सुरुवात केली. त्याची परिनीती म्हणजे या गावात महाराष्ट्र राज्याचे राज्यपुष्प असलेल्या जारूळ - तामन या वृक्षाचे २०० झाडे शेतकऱ्यांच्या बांधावर दिमाखात वाढत आहेत. एक हजार झाडांचा घनवन प्रकल्प बहुलीत खेळणेच्या काठी उभा आहे. हा बहुली चा ऑक्सिजन प्लांट आहे. या सोबत बहुलीत भिकन सोनने या शेत कऱ्याच्या बांधावर दुर्मिळ देशी ४० झाडांचा जैवविविधता प्रकल्प साकारला आहे. बहुलीत लेकीचे झाडं हा उपक्रम अभिनव उपक्रम सुरु आहे.मुलीचे जेव्हा लग्न होते तेव्हा तिची आठवन म्हणून एक "लेकीचे झाड" लावले जाते व आई वडील त्या झाडास मुलगी म्हणून वाढवतात. सिल्लोड शहरातील दत्त मंदिर आश्रमातही दुर्मिळ झाडे लावण्यात आली आहेत. ही दुर्मिळ वृक्ष जतनाची, रोपणाची किमया पाटील यांनी साकार केली आहे बीज संकलनातून. डॉ. पाटील यांनी सहयाद्री, सातपुडा आणी अजिंठा डोंगर कित्येकदा पायी भटकले आहेत ते विविध वनस्पती, झाडांच्या बिया जमा करण्यासाठी.झाडांचे, वेलिंचे बीज जमा करणे व स्वतः रोपे बनवून ती विविध ठिकाणी, विविध निमित्ताने ती लावून, संबंधितांना त्याच्या संगोपणाचे पालकत्व देवून ती जगविणे, वाढविणे हे फलीत म्हणूनच साध्य होत आहे.शासनाने १०० वर्ष वयाच्या पुरातन झाडांना वारसा वृक्ष - हेरिटेज ट्रि हा दर्जा देण्याचे धोरण संमत केले आहे. सिल्लोड तालुक्यातील चिंचवण येथे मुळ १० एकर अफाट आकाराचा ४०० वर्षे पुरातन शिवकालीन वट वृक्ष आहे. हा वृक्ष आता मानवी अतिक्रमण यामुळे केवळ २ एकर जमिनीवर उरला आहे. हा वृक्ष राज्य वारसा वृक्ष घोषित व्हावा म्हणून डॉ. पाटील यांनी सरकार कडे पाठपुरावा केला आहे व नुकतेच त्यासाठी वन विभागाची कमिटी येऊन सर्वेक्षण करून गेली आहे. या ४०० वर्ष पुरातन वडाच्या झाडाला वाचविण्यासाठी सर्व उपाय पाटील यांनी केले असून त्यास यश ही आले असून अशा १० पुरातन झाडांचा प्रस्ताव त्यांनी सरकारच्या राज्य वारसा वृक्ष समिती कडे सादर केले आहे.छ. संभाजी नगर जिल्ह्याच्या उत्तरेस असणाऱ्या अजिंठा डोंगरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वृक्ष तोड होते.सोयगाव, सिल्लोड च्या सीमेवर डोंगरालगत २० ते २५ अनधिकृत वीट भट्ट्या आहेत. त्यांना लागून च असलेल्या डोंगरातून देशी प्रजातीची झाडे भट्टी साठी उपलब्ध होतात.आपण एक झाड लावून मोठे व्हायला १० वर्षे लागतात मात्र हे लोकं क्षणात मोठे झाड भस्मसात करून निसर्गाची अ परिमित हानी करतात हे जाणून पाटील यांनी यावर आवाज उठवून बऱ्याच अंशी ही वृक्षतोड थांबवून या डोंगरातील हजारो झाडे वाचवली आहेत.आपल्या अनेक मित्रांचा वाढ़ दिवस हा झाडं दिवस म्हणून साजरा करत, त्या निणीत्ताने हजार हुन अधिक झाडे लावून जगविली आहेत. रोज किमान एकतरी झाडं लावणे हा राबता सतत १४ वर्षांपासून सुरु आहे. विविध वनस्पती व फुलपाखरे व त्यांचा अधिवास हे नाते आहे. फुलपाखरांना उपयोगी होस्ट प्लांट व नेक्टर प्लांट यांचे ही शेकडो झाडे शाळा - कॉलेज या ठिकाणी लावली गेली आहेत. शहरातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयास माणिक वन नामक बोटानीकल गार्डन हे डॉ. पाटील यांनी स्व खर्चाने, स्वतः रोपे बनवून निर्माण केले असून उच्च शिक्षित विद्यार्थी यांना ते मौलिक मार्गदर्शक ठरत आहे. अनेक दुर्मिळ प्रजाती त्यांनी शोधून काढल्या आहेत.विविध वनस्पतींचे औषधी गुणधर्म जगास परिचित करून देवून रिसर्च पेपर ही लिहिले आहेत. अनेक शाळा - कॉलेज, गावकरी यांना वृक्ष संवर्धन हेतू व्याख्याने ही दिली आहेत. अजिंठा वनक्षेत्रातून जाणाऱ्या सावळदबारा रस्त्यासाठी ५ हजार मोठ्या झाडांना वाचविण्यासाठी तोंडापूर, गोद्री, हळदा, येथील युवकांना या भागाचे वाळवंट होनु नये म्हणून झाडांना मिठी मारत " चिपको आंदोलन " करून हे ५ हजार झाडे वाचविली.राजस्थानातील खेजडी म्हणजेच शमीच्या झाडांसाठी अमृत देवी बिष्णोई यांनी बलिदान दिले त्या खेजडी म्हणजेच शमी चे अनेक रोपे त्यांनी विविध ठिकाणी लावून , नागरिकांना भेट पण दिली आहेत .किर्लोस्कर वसुंधरा गौरव पुरस्कार, मराठावाडा भूषण, आदी सारख्या अनेक पुरस्कारांनी हा हरीत सेवक सन्मानित झाला आहे.राज्य शासनाच्या वनविभागाच्या मानव - वन्यजीव संघर्ष समितीवर ते स्वीकृत सदस्य म्हणून सेवा देत आहेत.प्रत्येक गावात आपल्या सारखे शेकडो निसर्गदूत निर्माण करत, शाळा कॉलेजात हरित सेनानी निर्माण करून हा वृक्ष वारसा जतन करत आहेत.
0 Comments