राहुरी / प्रतिनिधी : तालुक्यातील चिंचोली येथून शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी कोल्हार, राहुरी येथे नेहमीच कामानिमित्ताने जा-ये करत असतात चिंचोली येथे राज्य परिवहन मंडळाच्या बस थांबत नसल्याने तासनतास रस्त्यावर ताटकळत उभे राहावे लागते. त्यामुळे महिलांची मोठी गैरसोय होते त्यामुळे येथे बस थांबविण्यासाठी चालक, वाहकांना सूचना देऊन गैरसोय टाळण्याची मागणी येथील महिलांनी केली आहे.
यासंदर्भात प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात महिला भगिनींनी सांगितले आहे की, चिंचोली येथे माध्यमिक विद्यालय आहे. दहावी नंतर मुलींना पुढील शिक्षणासाठी राहुरी, कोल्हार, लोणी अथवा संगमनेर सारख्या ठिकाणी जावे लागते तसेच ज्येष्ठ नागरिक, महिलांना राहुरी या तालुक्याच्या ठिकाणी अनेक शासकीय कामासाठी तसेच दवाखान्यासाठी जावे लागते मात्र कोणतीही साधी अथवा लांब पल्ल्याची बस येथे थांबत नाही. बाहेरगावहून आल्यानंतरही येथे चालक, वाहक साधे उतरून देत नाहीत. थेट कोल्हार येथे चार कि.मी. वर उतरावे लागते त्यामुळे प्रचंड गैरसोय होते. आशा सेविका तसेच अंगणवाडी सेविकांना वारंवार राहुरी, गुहा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व शासकीय कार्यालयात बैठकीसाठी जावे लागते त्यांनाही मोठ्या त्रासाला यामुळे सामोरे जावे लागते.
गत काळात येथे साध्या बसेसला थांबा होता मात्र त्याही बस प्रवाशांना डावलून परस्पर निघून जातात त्यामुळे खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. त्याही तीनचाकी रिक्षा सारख्या वाहनात प्रवाशांची प्रचंड रेलचेल चालक करीत असल्याने नाईलाजाने या जीवघेण्या प्रवासाला सामोरे जावे लागत आहे. वेळप्रसंगी या रिक्षाला लटकून प्रवास करण्याची नामुष्की महिलांवर येते. शासन महिलांना लाडक्या बहिणीचा दर्जा देते. मात्र त्यांना या जीवघेण्या प्रवासाला सामोरे जावे लागत आहे. त्यातून काही अपघातही घडतात यातून संबंधित विभागाने दखल घेवून महिला, ज्येष्ठ नागरिक, मुलींना न्याय देण्याकामी चिंचोली येथे बस थांबा देण्याची मागणी सुनिता बाळासाहेब काळे, अनिता वारूळे, मारिया मनतोडे, वैशाली पोपळघट, मंगल बोरसे, मिनाक्षी भाऊसाहेब भोसले, सुनिता कातोरे, मंगल आरगडे, कावेरी राऊत, वैशाली जाधव, भामाबाई ठोंबरे, लताताई वाघमारे, माया भोसले आदींसह बहुसंख्य महिलांनी पत्रकाद्वारे केली आहे.
0 Comments