शिर्डी( प्रतिनिधी)
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्या केलेल्या सर्व आरोपींना कठोर शासन व्हावे व फरार आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी. या मागणीसाठी गुरुवार 9 जानेवारी 2025 रोजी राज्यातील तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालय व कामकाज बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय सरपंच महासंघाचे राष्ट्रीय प्रभारी विजय वहाडणे, प्रदेशाध्यक्ष दत्तात्रय पांडुरंग शेटे ,उपाध्यक्ष बाळासाहेब जनार्दन जपे, यांनी एका पत्रकांद्वारे केले आहे.
या पत्रकात त्यांनी म्हटले की अखिल भारतीय सरपंच महासंघ परिषद नवी दिल्ली महाराष्ट्र राज्याच्या वतीने बीड जिल्ह्यातील मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येचाअ.भा सरपंच महासंघ परिषदेच्या वतीने निषेध करण्यात येत असून या निर्गुण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शासन व्हावे. त्याचप्रमाणे फरार आरोपींना त्वरित अटक करावी. मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या मुलीला शासकीय सेवेत सामावून घ्यावे. कै. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना दर महिन्याला उदरनिर्वाहासाठी शासनाकडून आर्थिक सहाय्य मिळावे. तसेच महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायत यांच्या सरपंच उपसरपंच यांना पोलीस संरक्षण मिळावे आदी मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आलेल्या आहेत. हे निवेदने
शिर्डीचे अप्पर जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी ,तसेच शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी व राहता पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना देण्यात येत आहे.
यासंदर्भात बोलताना अखिल भारतीय सरपंच महासंघ परिषदेचे महाराष्ट्राचे राष्ट्रीय प्रभारी विजय वहाडणे यांनी सांगितले की, तळागाळातील गोरगरिबांचे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काम करणाऱ्या सरपंचाची अशी निर्गुण हत्या होत असेल तर लोकशाहीला काही अर्थ उरत नाही. या घटनेचाअ.भा. सरपंच महासंघ जाहीर निषेध करीत आहे .असे सांगितले तर सरपंच महासंघाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष दत्तात्रय शेटे यांनी म्हटले की, मस्साजोग सारख्या घटनाची राज्यात पुनरावृत्ती होऊ नये. म्हणून महाराष्ट्रातील सर्व सरपंच, उपसरपंच ,सदस्य यांनी या घटनेचा निषेध म्हणून गुरुवार 9 जानेवारी 2025 रोजी ग्रामपंचायत कार्यालय बंद ठेवून व कामकाज बंद ठेवून निषेध पाळावा. शांततेत बंद ठेवून सहकार्य करावे .असे म्हटले आहे. तर सरपंच महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब जनार्दन जपे म्हणाले की,
मस्काजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा सर्वत्र जाहीर निषेध होत आहे.कै. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना अ.भा.सरपंच महासंघ परिषदेच्या वतीने आर्थिक सहाय्य केले जाईल. त्याचप्रमाणे त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी ही आर्थिक मदत करणार असल्याचे यावेळी सांगितले.व गुरुवार 9 जानेवारी 2025 रोजी ग्रामपंचायत बंद व कामकाज बंद ठेवून सर्व सरपंच उपसरपंच, सदस्य यांनी या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी शांततेने सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
0 Comments