गर्द धुक्याने आभाळ धरतीवर अवतरल्याची अनुभुति

गर्द धुक्याने आभाळ धरतीवर अवतरल्याची अनुभुति 



लोहगाव (कोडीराम नेहे)

रविवार व सोमवारी पहाटच्या गर्द धुक्यात सर्वकाही दिसेनासं होत जणू आभाळ धरतीवर अवतरल्याची अनुभुति जाणवली साधारण तास दिड तासाच्या या दाट धुक्यात सर्वकाही हरवून गेल्याचे चित्र पहावयास मिळालं.रस्त्यावरून धावत असलेल्या वाहनांचा मिणमिणता प्रकाश वाहने जवळ आल्यावर दिसत होता. 
  रविवारी व सोमवारी पहाटेच्या दरम्यान दाट धुक व त्यातून पडणारे दवबिंदू, यातून बोचणारी आल्हाददायक थंडीचे उत्साही वातावरण दरवर्षी प्रमाणे यंदाही ग्रामीण भागातील नागरिकांना अनुभवायला मिळाले 'नभ उतरू आलं' या प्रत्ययाचा अनुभव प्रत्यक्ष पहावयास मिळाला. रस्त्यावरून येणारे वाहन अगदीच जवळ आल्यावर त्याच्या मिणमिणत्या प्रकाश व आवाजाने जाणवत होतं तर नगर-मनमाड या महामार्गावर अघोषित संचारबंदीचे वातावरण पहावयास मिळत होते. फुटभर अंतरावर काहीच दिसत नसल्याने वाहनचालकांनी आपापली वाहने काही काळ रस्त्याच्या कडेला उभी ठेवत या वातावरणाचा अनुभव घेत गरमागरम चहाचा आस्वाद घेताना दिसत होते. 
  सध्या आठ ते दहा दिवसापासून ढगाळ वातावरण असल्याने कडाक्याच्या थंडीने माघार घेतली आहे. थंडीची जागा आता आर्दतायुक्त वातावरणाने घेतली असल्याने त्याचा फटका फळबागांसह भाजीपाला व कांदा पिकांना बसत आहे. नुकतेच मोहोरात आलेले आंबा झाडांनाही या धुक्याचा फटका बसण्याची शक्यता फळबाग धारकांकडून व्यक्त होत आहे. तर धुक्याने कांदा रोपे व लागवड केलेल्या कांदा पिकांना मोठा धोका संभवण्याचे संकेत शेतीतज्ञ सांगत आहेत. शनिवारी सायंकाळी झालेल्या पावसाने या पिकांच्या नासाडीत वाढ होणार आहे. आधीच शेतमालाच्या पडलेल्या भावाने शेतकरी चिंताग्रस्त आहे त्यात या अस्मानी संकटाने मोठा हातभार लावल्याने बळीराजाच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. उधार ऊसनवारी करून उभी केलेली पिके वातावरणीय बदलामुळे संकटात सापडली आहेत. या बदलामुळे महागडे फवारे मारण्याचा खर्च परवडेनासा झाला असल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे. पण हेही दिवस निघून जातील या एका आशेवर शेतकरी वर्ग मनाला घट्ट करत आहे. 
  एकूणच शेतकरी वर्गात वाढलेल्या चिंतायुक्त स्थितीत, गर्द धुक्यातली मनमोहक पहाट पाहण्याचा नि तो  अनुभवण्याचा अविस्मरणीय तास दिड तासाचा तो काळ अगदी मन मोहून गेल्याचे ग्रामीण जनतेने सांगितले. 

Post a Comment

0 Comments