वारकरी संप्रदायात संतांची भेट जणू परमेश्वराची भेट! आपुलकी, शिष्टाचार व आदरतिथ्य याचा नाही राहत पारावर!ह भ प इंदुरीकर महाराज व ह भ प संजयजी महाराज जगताप यांच्या भेटी प्रसंगी अशीच उपस्थितीतांनी घेतली अनुभूती!

शिर्डी (प्रतिनिधी)परमेश्वाची भक्ती आणि चांगल्या वर्तणुकी द्वारे सामान्य जनांना साथ देणाऱ्या  व अध्यात्माचा उपदेश करणाऱ्या आणि त्याचबरोबर स्वतः स्वच्छ, सुंदर आचरण करून आदर्श निर्माण करणाऱ्या साधुसंत व महाराजांच्या या महाराष्ट्राला‌ मोठं संत परंपरेचं व अध्यात्मिक असं अधिष्ठान आहे. येथे अनेक साधुसंत, प्रवचनकार, कीर्तनकार ,योगी , महंत होऊन गेले आहेत व सध्याही आपले धर्म प्रसार प्रचार व अध्यात्मिक ज्ञान उपदेश करण्याचे काम वेगवेगळ्या आध्यात्मिक मार्गातून या विभूतींकडून सुरू आहे. 
संत ज्ञानेश्वर म्हणतात,
तैसे होय तिये मेळी। मग सामरस्याचिया राऊळी।
महासुखाची दिवाळी। जगेसी दिसे।। (ज्ञाने. ६.३८९)
ब्रह्म ऐक्याच्या अद्वैत भूमिकेतून संपूर्ण जगाची अनुभूती घेणे, ही महासुखाची दिवाळी असते. विश्व हे चैतन्यरूप आहे, हे पाहण्याची आनंददृष्टी ज्याला लाभते, तोच खरा योगी असतो. जगाकडे समान बुद्धीने पाहणे ज्याला शक्य आहे, तो योगी महासुखाची दिवाळी अनुभवतो.
सर्वाठायी समभाव ठेवून, सर्वांशी प्रेमाने वागण्यात, सामान्य माणसाला ही समत्वाची अनुभूती येते आणि तोही एका अर्थाने योग्याच्या अवस्थेला जातो. संपूर्ण जगाकडे एका समत्व भावाने पाहून सुखाची अनुभूती घेणे, हीच महासुखाची दिवाळी होय. संतांना ज्ञानाची दिवाळी, महासुखाची दिवाळी आणि नित्य किंवा निरंतर दिवाळी अभिप्रेत आहे. संतांच्या लेखी साधुसंतांच्या भेटी, हाच खरा आनंद आहे. असाच आनंद नुकताच दोन प्रसिद्ध कीर्तनकार यांच्या एका भेटीत दरम्यान अनुभवला मिळाला.
कै.वत्सलाबाई ज्ञानदेव पा.चव्हाण यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्ताने सुराळा तालुका वैजापूर येथे सर्व प्रथम ह भ प निवृत्ती महाराज इंदोरीकर  यांचे किर्तन पार पडले .त्यावेळी ह भ प श्री संजयजी महाराज यांचे बरोबरच ॲड श्री प्रमोद दादा जगताप, आ.श्री रमेश बोरणारे सर, सर्वश्री श्री बाबासाहेब भाऊ जगताप, श्री कल्याणराव जगताप, श्री रावसाहेब पाटील जगताप व इतर मान्यवरांची उपस्थिती होती. किर्तन संपन्न झाल्यानंतर ह भ प निवृत्ती महाराज इंदुरीकर व ह भ प संजयजी महाराज जगताप यांची भेट होऊन चर्चा झाली. दोन कीर्तनकार संतांच्या भेटी झाल्या.संतभोजनाच्या कार्यक्रमासाठी ह भ प श्री संजयजी महाराज यांना ह भ प इंदोरीकर महाराज यांनी आपली खुप दिवसांनी भेट झाली असून त्यांना त्यांच्याच गाडीत घेऊन संत पंगत असणाऱ्या घरी घेऊन गेले व त्यांना तेथे  जेवणासाठी भव्य दिव्य रांगोळी काढलेल्या स्वतःच्या जागेवर हभप संजयजी महाराज यांना तुम्ही गुरुवर्य नारायणगीरी महाराज यांचे शिष्य आहेत. आपण जेवणासाठी माझ्या जागेच्या त्या ठिकाणी बसावे असं सांगितलं व हभप संजय महाराज जगताप यांना  तेथे बसवून ते त्यांच्या शेजारी भोजनास बसले . व आनंदात त्या दोन्ही कीर्तनकार महाराजांनी तसेच वारकरी बंधूंनी भोजन घेतले.  आजच्या युगामध्ये असं सहसा होत नाही. मात्र हे फक्त वारकरी संप्रदायात होऊ शकतं .हे यावरून दिसून आलं.यातूनच दोन संत महात्मे कीर्तनकार प्रवचनकार एकत्र आले तर एक वेगळ्या सुखाची कशी अनुभूती येते. संतांच्या लेखी साधू संतांच्या भेटी हाच कसा खरा आनंद आहे.  असे जे म्हटले जाते ते यातून दिसून येते. वारकरी संप्रदायातील संताचा शिष्टाचार व आदारातिथ्य कसा केला जातो .हे यावरून येथे दिसून आले. वारकरी पंथामध्ये कोण छोटा नाही, कोण मोठा नाही, कोण अज्ञानी नाही, कोण विद्वान नाही, कोण गरीब नाही, कोण श्रीमंत नाही, सर्व काही पांडुरंगाची लेकरे असून सर्व समान आहेत ,अशी शिकवण दिलेली असल्यामुळेच वारकरी संप्रदायात प्रत्येक जण माऊली असतो. व आई दैवत प्रमाणे प्रत्येक जण एकमेकांना नतमस्तक होत असतो. हे या उदाहरणावरून दिसून येत आहे. अशा या दोन्हीही संत कीर्तनकार महाराजांना सर्वांचेच वंदन आहे.

Post a Comment

0 Comments