विधानसभेचे अध्यक्ष ऍड राहुल नार्वेकर यांनी शिर्डीला भेट देऊन साईबाबांचे घेतले दर्शन ! साई संस्थानच्या वतीने त्यांचा करण्यात आला सत्कार!

शिर्डी( प्रतिनिधी) महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष एड. राहुल नार्वेकर यांनी आज शनिवारी शिर्डीला भेट देऊन साईबाबांचे दर्शन घेतले. साई दर्शननंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थान च्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी श्री साई मूर्ती व शाल देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात उपस्थित होते.
राहुल नार्वेकर हे भारतीय राजकारणी आणि भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत. ते सध्या कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. आणि महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष देखील आहेत. नार्वेकर यांची जून २०१६ मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेवर राज्यपालांचे नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड झाली आहे.
 राहुल नार्वेकर हे पेशाने वकील आहेत. त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात ही शिवसेनेपासून झाली. शिवसेनेत ते प्रवक्तेपदावर होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने त्यांना तिकीट नाकारल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राहुल नार्वेकर यांनी २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली पण त्यांना शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंकडून पराभवाचा सामना करावा लागला. नंतर राष्ट्रवादी काँग्रेसने २०१४ साली त्यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून पाठवलं होतं. २०१९ च्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर नार्वेकर राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये सामील झाले. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत ते भाजपच्या तिकीटावर मुंबईतील कुलाबा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. शिवाय भाजपकडून त्यांना मीडिया इंचार्ज पदाची जबाबदारीही देण्यात आली होती.
राहुल नार्वेकर यांचे वडील सुरेश नार्वेकर मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक होते. त्यांचे भाऊ मकरंद आणि वहिनी हर्षिता या सध्या मुंबई महापालिकेत भाजपकडून नगरसेवक आहेत. महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राष्ट्रवादीचे रामराजे नाईक-निंबाळकर हे राहुल नार्वेकरांचे सासरे आहेत. तर राहुल नार्वेकर हे विधानसभेचे अध्यक्ष आहेत.
नुकत्याच महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. आता नवीन मंत्रिमंडळ स्थापन होईल तसेच  नवनिर्वाचित आमदारांचा विधानसभेमध्ये शपथविधी पार पडेल, तत्पूर्वी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिर्डीला भेट देऊन श्री साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले.

Post a Comment

0 Comments