महिलांसह हिंदू धर्मावर डॉ. आंबेडकरांचे मोठे उपकारमिलिंदकुमार साळवे यांचे प्रतिपादन



संघ कार्यालयात डॉ. आंबेडकर, अण्णा भाऊ साठे यांच्या तैलचित्रांचे अनावरण

टाकळीभान ( प्रतिनिधी)- भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना तसेच
हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून सर्व भारतीयांसह
 हिंदू समाजावर व महिलांवर प्रचंड असे उपकार केले आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य, भाजपचे शहर उपाध्यक्ष मिलिंदकुमार साळवे यांनी केले. 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या श्रीरामपूर येथील दामू अण्णा दाते भवनात लोकहित मंडळाच्या वतीने ७५ वा अमृत महोत्सवी भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या श्रीरामपूर येथील दामू अण्णा दाते भवनात लोकहित मंडळाच्या वतीने संविधान दिनाचे औचित्य साधून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न, महामानव, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर, साहित्यरत्न, साहित्यसम्राट डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या तैलचित्रांचे अनावरण ज्येष्ठ पत्रकार व मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य मिलिंदकुमार साळवे व प्रा. शिवाजीराव पंडित यांच्या हस्ते करण्यात आले. लोकहित मंडळाचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उत्तर नगर जिल्हा संघचालक किशोर निर्मळ अध्यक्षस्थानी होते. मंडळाचे कार्यवाह केशव आवटी यांनी प्रास्ताविक केले. उपक्रम प्रमुख गणेश नवले यांनी स्वागत केले. प्रारंभी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये बळी पडलेल्या शहीद जवान व नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी मिलिंदकुमार साळवे म्हणाले, समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता या प्रमुख चार स्तंभांवर, चतुःसूत्रीवर आधारित जगातील सर्वात मोठी, लिखित, आदर्श राज्यघटना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला दिलेली आहे. आतापर्यंत राज्यघटनेविषयी समाजात न होणारी चर्चा आता गेल्या काही वर्षांपासून होत आहे, ही चांगली बाब आहे. हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेबांनी हिंदू समाजावर प्रचंड असे उपकार केले आहेत. सर्वच जाती, धर्मांचा राज्य घटनेद्वारे सन्मान ठेवण्यात आला आहे. पण डॉ. बाबासाहेबांनी केलेले विशाल कार्य आजही समाजाच्या तळागाळापर्यंत न पोहचल्यामुळे उपेक्षित आहे, अशी खंतही साळवे यांनी व्यक्त केली.
भारतात विविध जाती, धर्म, पंथ, भाषा असतानाही फक्त भारतीय राज्यघटनेमुळेच देशात एकता, अखंडता आहे, असे प्रा. शिवाजीराव पंडित यांनी सांगितले. किशोर निर्मळ म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये सर्व जाती, धर्माचे स्वयंसेवक विविध गतीविधींमध्ये सहभागी होत असतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे निस्सीम राष्ट्रवादी होते. राष्ट्रवाद, राष्ट्रभक्तीसोबतच त्यांनी प्रत्येक व्यक्तीच्या आत्मसन्मानास महत्त्व दिले.
प्रमुख वक्ते समरसता मंचाचे उत्तर नगर जिल्हा गतीविधी संयोजक वसंतराव कदम यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, समरसता मंच यांच्या कार्यावर प्रकाशझोत टाकला. तसेच डॉ. आंबेडकर व लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या उत्तुंग कार्याचा जीवनपट समोर मांडला.
समाजाच्या विविध घटकांमध्ये, विविध पातळीवर आजही मोठ्या प्रमाणात विषमता दिसत आहे. ही विषमता दूर करून समाजात समरसता निर्माण करण्याची ताकद फक्त महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमातून साकारलेल्या भारतीय राज्य घटनेमध्येच आहे. या राज्य घटनेमुळेच खरी समरसता निर्माण होऊ शकेल, असा विश्वासही कदम यांनी व्यक्त केला.
 विजय ढोले यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी संघाचे श्रीरामपूर तालुका कार्यवाह प्रमोद शेजूळ, देवीदास चव्हाण, महेश देशपांडे, श्रीरामपूर पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक गाडेकर, रिपाइंचे सुभाष त्रिभुवन, समरसता मंचाचे रामचंद्र भवर, भूषण साठये आदी उपस्थित होते.

*फोटो ओळ~*
श्रीरामपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दामू अण्णा दाते भवनात लोकहित मंडळाच्या वतीने अमृत महोत्सवी संविधान दिनानिमित्त भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या तैलचित्रांचे अनावरण ज्येष्ठ पत्रकार मिलिंदकुमार साळवे व प्रा. शिवाजीराव पंडित यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी उत्तर नगर जिल्हा संघचालक किशोर निर्मळ, केशव आवटी, भूषण साठये, गणेश नवले आदी.

Post a Comment

0 Comments