मुंबई ( प्रतिनिधी) आज मंगळवार दि. २६ नोव्हेंबर रोजी राज्य विधानसभेची मुदत संपत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना सादर केला.
त्याचवेळी नव्या सरकारचा शपथविधी होईपर्यंत राज्यपाल शिंदे यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्य कारभार पाहण्यास सांगण्यात आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंगळवारी सकाळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवनावर भेट घेऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. राज्यपालांनी हा राजीनामा स्वीकारून नवीन मुख्यमंत्र्यांची नियुक्ती होईपर्यंत शिंदे यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करत असल्याचे पत्र त्यांना सुपूर्द केले. यावेळी देवेंद्र फडणवीस ,अजित पवार ,दीपक केसरकर, दादाजी भुसे आणि चंद्रकांत रघुवंशी हे देखील उपस्थित होते.
दरम्यान विधानसभा निवडणुकीत निर्विवाद यश मिळाल्याने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून कुणाची निवड करायची, असा पेच भाजपा पक्षश्रेष्ठींसमोर आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने पुन्हा ब्राम्हण चेहरा देण्याऐवजी मराठा किंवा ओबीसी नेत्याच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घालण्याचे भाजपामध्ये घाटत असून आज यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत केंद्रीय निरिक्षक म्हणून येत आहेत.
विनोद तावडे, चंद्रकांत पाटील, या मराठा चेहर्यांसह गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, या ओबीसी नेत्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.भाजपाने राजस्थान आणि मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील नेत्यांना बाजूला काढून नव्या चेहर्याला संधी दिली होती. त्यामुळे भाजपाकडून राज्यात राजस्थान, मध्य प्रदेश पॅटर्न राबवला जाण्याच्या चर्चेने जोर धरल्याने भाजपात कमालीची शांतता आहे.
0 Comments