शिर्डी (राजकुमार गडकरी)
अवघ्या दोन दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली असून विधानसभा निवडणुकीच्या गडबडीतच बाहेर पडलेल्या नागरिकांनी , व महिलांनी विविध खरेदीसाठी बाजारात गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. बाजारपेठा आता गर्दीने फुलून गेल्या आहेत. दुकानांमध्येही ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. जिकडे तिकडे दिवाळीची लगबग तसेच या सणाचा मोठा उत्साह सर्वांमध्ये दिसून येत आहे.
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विक्रेत्यांनी सवलतींची खैरात चालवली आहे. पगार, दिवाळी भेट,बोनस हाती पडताच कामगारही आपल्या परिवारासोबत खरेदीला बाहेर पडताना दिसत आहेत.
सर्वाना भावणारा दीपोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळी सणाच्या पाश्र्वभूमीवर बाजारपेठ पूर्णपणे सजली असून ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे. शिर्डी, राहता, लोणी, पुणतांबा, कोल्हार, सावळीविहीर आदींसह विविध गावे आणि शहरातील मुख्य रस्त्यांबरोबर इतर महत्त्वाच्या ठिकाणी कपडे, आकाशकंदील, फटाके, पणती, रांगोळी, सुगंधी तेल आदींचे स्टॉल मोठय़ा प्रमाणात उभारलेले ठिकठिकाणी ,चौका चौकात दिसून येत आहेत. दिवाळी सणाच्या पाश्र्वभूमीवर शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वत्र इमारतींवर रंगरंगोटी, आकर्षक विद्युत रोषणाई, करण्यात आल्याचे दिसत आहे.
वर्षातला मोठी खरेदी आणि विविध प्रकारचे गोडधोड आणि आनंद द्विगुणीत करणारा सण म्हणजे दीपावली. दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर तालुक्यातील विविध शहरात मोठय़ा प्रमाणात उलाढाल होत असते. सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने खरेदीसाठी संपूर्ण बाजारपेठ सजली आहे. विविध प्रकारचे तयार कपडे, बालगोपालांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस, विविध प्रकारचे सजावटीचे साहित्य, अत्तर, फटाके, आकाशकंदील, पूजेचे साहित्य, विविध रंगांच्या रांगोळ्या आदी विविध प्रकारचे स्टॉल उभारण्यात आले असून रात्रीच्या वेळी मुख्य रस्त्यांवर गर्दी वाढत आहे. विविध संस्था ,संघटना यांनी माफक दरात रेडिमेट मिठाई, फराळाची स्टॉल मांडले आहेत.
रेडिमेड फराळाला मागणी दिसून येत आहे. तसेच अनेक ठिकाणी विशेषता ग्रामीण भागात, घरोघरी लाडू ,करंज्या, शंकरपाळे आदी फराळ बनविण्यासाठी महिलांची लगबग घरोघर दिसून येत आहे.
नोव्हेंबरच्या पहिल्याच
आठवडय़ात दिवाळी आल्याने शहरातील अनेक गृहिणींना फराळ तयार करण्यासाठी वेळ कमी मिळत आहे. त्यामुळे यंदा रेडिमेड फराळावर ताव मारणा-यांसाठी गृहउद्योग फराळाच्या तयारीला वेग आला आहे. मार्केटमध्ये विविध स्टॉल मिठाईचे लागले आहेत.यंदा दिवाळीमध्ये मध्यमवर्गीयांचा फराळ विकत घेण्याकडे मोठय़ा प्रमाणात कल आहे. त्यामुळे बाजारपेठेत असे तयार फराळ विक्रीच्या स्टॉल्सवर महिलांची गर्दी दिसत आहे.
लक्ष्मीपूजन व पाडवाला घरोघरी लक्ष्मीपूजनाची, वही पूजनाची सर्वांची लगबग असते.या पूजनासाठी झाडू, झेंडूची फुले, केळीचे खांब, कच्ची फळे, चुरमुरे, फुटाणे, बत्तासे खरेदीकडेही लोकांचा कल दिसून येत आहे.
भारतीय परंपरेत स्वच्छतेचे महत्त्व पूर्वापार आहे. दसऱ्यापूर्वी घरोघरी स्वच्छता मोहीम हाती घेतली जाते. त्यानंतर देवीची प्रतिष्ठापना होते.
दिवाळीनिमित्त केल्या जाणाऱ्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूच्या पूजेचा मान आहे. झाडूचे कितीही आधुनिक प्रकार आले, तरी या दिवशी ‘फडय़ा’ला म्हणजे ग्रामीण भाषेत शिरईला अधिक महत्त्व असते. शिंदीच्या पानापासून तयार केल्या जाणाऱ्या फडय़ाला(लक्ष्मी म्हणतात) अधिक मान असतो. या वर्षी या शिरई ( फडय़ाची )किंमत 100 ते दीडशे रुपयांपर्यंत वधारली आहे .
केळीचे खांब व नारळाच्या फांद्यांना लक्ष्मीपूजनानिमित्त मोठी मागणी असते.
झेंडूच्या फुलांनाही नेहमीप्रमाणेच मोठी मागणी आहे. पिवळय़ा, भगव्या झेंडूची फुले हे बाजारपेठेचे मुख्य आकर्षण होते. शिर्डीला सकाळी भरणाऱ्या फुलाच्या मार्केटमध्ये झेंडू गलांडा गुलाबाच्या फुलांनाही मोठी मागणी वाढली आहे. शिर्डी व परिसरात अनेक शेतकरी फुलशेती करीत आहेत. या शेतकऱ्यांना या वर्षी दिवाळीनिमित्त फुलाचे चांगले पैसे होतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने कच्च्या फळांचा मान पूजेसाठी असतो. डाळींब, केळी, सीताफळे, पेरू या फळांसह विविध फळांची पानेही पूजेसाठी वापरली जातात.
फळाबरोबरच प्रसादाचे स्वतंत्र स्टॉल्सही बाजारपेठेत उपलब्ध होते. सर्वच ठिकाणी लोकांना पॅकेजची सवय लागली आहे, त्यामुळे एकाच ठिकाणी सर्व पूजेचे साहित्य उपलब्ध करणारे स्टॉल्सही विक्रेत्यांनी उभारले होते. संगणकाच्या जमान्यातही खातेवहीचे महत्त्व कमी झाले नाही. याही वर्षी खातेवही खरेदीसाठी बाजारपेठेत झुंबड उडाली होती. त्याचप्रमाणे पूजेसाठी श्री लक्ष्मीची मूर्ती ही ठिकठिकाणी बाजारात दिसून येत आहे. विविध रंगांच्या रांगोळ्या, विविध आकाराच्या नक्षीकाम केलेल्या पणत्या, छोटे मोठे रंगीबेरंगी आकाश कंदीले , फटाक्यांची स्टॉल, मिठाई फराळांची स्टॉल, हार फुलांचे स्टॉल, पूजेच्या सामानांचे स्टॉल, तसेच किराणा दुकान ,मॉल, कपड्यांचे दुकाने, शॉपिंग सेंटर सर्वत्र ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. बस,रेल्वे ,खाजगी प्रवासी वाहने यांनाही गर्दी होत आहे. सुट्ट्या लागल्यामुळे बाल गोपाळही आनंदी आहेत. वर्षातला सर्वात मोठा दिवाळी सण आनंदाने मोठ्या उत्साहात साजरा करण्याच्या तयारीत सर्वजण आहेत. एकमेकांना प्रत्यक्ष भेटून, सोशल मीडियावर, फ्लेक्स बोर्ड लावून, विविध दिवाळीचे भेट देत, एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणूक ही घोषित झाले आहे. उमेदवारी अर्जही दाखल झाले आहेत. त्यामुळे आता हळूहळू राजकीय नेते मैदानात उतरू लागले असून प्रचारही सुरू झाला आहे. गाठी-भेटींना वेग आला आहे. एकूणच निवडणुकीचीही धामधूम वाढली आहे.
सर्वत्र दिवाळीची लगबग, व त्यात निवडणुकीची धामधुम यामुळे सर्वत्र जोशपूर्ण उत्साहाचे वातावरण सध्या दिसून येत आहे.
0 Comments