शिर्डी (राजकुमार गडकरी)
विकासाचे सोडाच केवळ हसून सभा करणाऱ्या संगमनेरच्या नेत्यांनी काहीच केलं नाही. त्यांच्या तालुक्यातच त्यांची निष्क्रियता उघड झाली आहे. असे असतानाही राजकारण करण्यासाठी ठेकेदार आणि माफियांच्या जीवावर काही लोकांना हाताशी धरून ते आपल्या भागात येत आहेत .परंतु या भागातील जनता त्यांना थारा देणार नाही. राहाता तालुक्यातील जनता ही त्यांच्या खोट्या भूलथापांना कधीही बळी पडणार नाही .असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी राहाता येथे केले.
राहाता येथे शिर्डी विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या वतीने महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सिद्ध संकल्प मंगल कार्यालयात झालेल्या विजयी संकल्प मेळाव्यातून नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे पदाधिकारी ,कार्यकर्ते आणि मतदारांशी संवाद साधताना बोलत होते.
यावेळी ज्येष्ठ नेते माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, कोपरगावचे आमदार आशुतोष काळे,मा.खा. डॉ. सुजय विखे पा. सौ शालिनीताई विखे पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, शिवसेनेचे सागर बोठे, भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक रोहम, ओबीसी आघाडीचे बाळासाहेब गाडेकर, मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ नेते रऊफ मौलाना, मुकुंदराव सदाफळ,बाळासाहेब जपे ,ओमेश जपे, आदींसह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमा अगोदर राहता शहरातून कार्यकर्त्यांनी भव्य असे रॅली काढली होती. वेगवेगळ्या गावातूनही मोटरसायकल रॅली आल्या होत्या. घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. या राहता शहरातील रॅलीमध्ये नामदार विखे पाटील ही दुचाकी वर बसून सहभागी झाले होते. व्यासपीठावर त्यांचे आगमन होताच लाडक्या बहिणीने नामदार विखे पाटील यांचे राख्या बांधून जोरदार स्वागत केले.
या कार्यक्रमात नामदार राधाकृष्ण विखे पाटील पुढे म्हणाले की, महायुती सरकारच्या माध्यमातून या मतदारसंघातील खंडकरी शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवून या शेतकऱ्यांना न्याय देता आला. निळवंड्याच्या कालव्याचे पाणी दिलेल्या शब्दाप्रमाणे येथे आणून दाखवले. त्याचप्रमाणे शेती महामंडळाची सुमारे पाचशे एकर जागा एमआयडीसीला देऊन या मतदारसंघात औद्योगिक वसाहतीची उभारणी सुरू केली. जवळजवळ तीन ते चार हजार कोटी गुंतवणूक एमआयडीसीत होणार असून पाच ते सात हजार तरुण यांना रोजगार मिळणार आहे. आमदार आशुतोष काळे यांच्या मागणीनुसार त्यांनाही एमआयडीसीसाठी जागा दिली.
जिल्ह्याच्या नामांतराबरोबरच नेवासा येथील ज्ञानेश्वर सृष्टी, अहिल्यादेवींचे राष्ट्रीय स्मारक उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने ही लोकहिताची कामे करता आली. महायुती सरकारने आता पश्चिम वाहिन्या नद्यांचे पाणी पूर्वेकडे वळवण्याचा निर्णय घेतला आहे. एक रुपयात पिक विमा योजनेचा मोठा लाभ शेतकऱ्यांना मिळाला आहे. मोफत वीज देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे .मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला मिळालेल्या प्रतिसादामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांना धडकी भरली. महाविकास आघाडीकडे सांगायला काही राहिलेले नाही.विविध योजना, विकास प्रकल्प, महायुती सरकारने राबवले आहेत. त्यामुळे जनतेला काय सांगायचे असा प्रश्न विरोधकांकडे आहे. मात्र महा विकास आघाडीचे नेते आता मत मागायला दारात येतील. खोटी आश्वासने देतील. तेव्हा त्यांना जाब विचारा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. येत्या विधानसभेची निवडणूक ही तुमच्या सर्वांची आहे. मताधिक्य देण्याचे काम तुमचे आहे .गावात आणि बुथवार चांगल्या पद्धतीने काम करा, असे आवाहान करून विकासाच्या प्रक्रियेत आणि आपल्या अन्नात माती कालवणाऱ्यांना धारा देऊ नका. असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच तालुक्या बाहेरून तुम्ही आमच्याकडे येऊन काही बोलायचे ती तुमच्यासाठी लोकशाही असते. आम्ही थोडी टीका केली तर लगेच लोकशाही धोक्यात आल्याचा आरोप करायचा, लोकशाही धोक्यात कुठेही आली नाही .मात्र तुमचे पद आता धोक्यात आले आहे. त्यामुळे तुम्ही अस्वस्थ झाला आहात. असा विरोधकांना टोला लगावत वाळू माफिया व एजंटांना पुढे करून डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यावर हल्ला करण्याचा कट केल्याचा आरोपाचा पुनरुच्चार त्यांनी करत आम्ही वसंत देशमुख यांच्या वक्तव्याचे कधीही समर्थन केले नाही. उलट त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. पण ज्या सभेला आलेल्या निष्पाप महिलांना, पुरुषांना तेथे मारहाण झाली त्यांची माफी मागण्याची तुमची दानत नाही. असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी मा.खा. डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी बोलताना सांगितले की, मी चार सभा तेथे घेतल्या तर त्यांचे सिंहासन हलले. ही तर सुरुवात आहे. आता इकडे येऊन तुम्ही काय करणार! ज्यांच्यासाठी येत आहेत त्यांच्याकडूनही काही होणार नाही. हे या तालुक्यातील जनतेला माहित आहे. मात्र आमच्या तालुक्यात येऊन खालच्या पातळीवर जाऊन बोलला तर आम्ही आता कायद्याच्या सर्व चौकटी सोडून उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. आमची सहनशीलता ही कमजोरी समजू नका .असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, आमदार आशुतोष काळे, मौलाना रऊफ, सुरेंद्र थोरात यांची भाषणे झाली. या कार्यक्रमाला राहता तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, चेअरमन, विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments