मातीचा राजा” – शेतकऱ्यांच्या कष्टांना मानाचा मुजरा



श्रीरामपूर (प्रतिनिधी) – ग्रामीण संस्कृतीचा सुगंध, शेतकऱ्यांच्या मेहनतीचा अभिमान आणि सिनेमॅटिक सादरीकरणाचा अनोखा संगम घेऊन “मातीचा राजा” हे मराठी गाणं रसिकांच्या भेटीस आले आहे. या व्हिडिओचे निर्माता आबा निर्मळ हे मूळचे ग्रामीण पार्श्वभूमीचे असून, सध्या एका केमिकल कंपनीत नोकरी करत असतानाही मातीतल्या प्रेमासाठी आणि शेतकऱ्यांच्या मनोरंजनासाठी त्यांनी हा हटके व्हिडिओ तयार करण्याचा निर्धार केला.

दिग्दर्शक प्रमोद पंडित यांच्या कलात्मक दृष्टीकोनातून साकारलेल्या या व्हिडिओत गावच्या धुळीच्या रस्त्यांपासून ते हिरव्यागार शेतांपर्यंतचे जीवन अत्यंत प्रभावी फ्रेम्समध्ये टिपण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या गाण्यातील सर्व कलाकार हे अस्सल शेतकरी कलाकार आहेत. नवीन चेहऱ्यांना संधी देत, त्यांच्या नैसर्गिक अभिनयातून ग्रामीण जीवनाची खरी झलक रसिकांसमोर आणली गेली आहे.

“मातीचा राजा” हे केवळ एक गाणं नसून, शेतकऱ्यांच्या श्रम, संघर्ष आणि मातीतल्या नात्याला वाहिलेला मानाचा मुजरा आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळत असून, दादासाहेब फाळके चित्रपट युनियनचे जिल्हा सचिव ज्ञानेश्वर साबळे यांनी सर्व शेतकरी बांधवांना या गाण्याला भरभरून प्रतिसाद देण्याचे आवाहन केले आहे.
या गाण्यातून शेतकऱ्यांच्या मेहनतीचा सन्मान होत असताना, ग्रामीण कलावंतांना व्यासपीठ मिळाले आहे. मातीचा सुगंध, कष्टाची कहाणी आणि सिनेमॅटिक सौंदर्याचा संगम असलेला “मातीचा राजा” हा व्हिडिओ ग्रामीण आणि शहरी दोन्ही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Post a Comment

0 Comments