जागतिक वारसा स्थळ असलेले अजिंठा डोंगरातील वन संपदा धोक्यात,अधिक डिंक काढण्यासाठी मानवी आरोग्य व झाडांना गंभीर धोका--



दिलीप शिंदे सोयगाव
 सोयगाव दि.01 - अजिंठा व सोयगाव प्रादेशिक वन क्षेत्रात सुमारे 18 ते 20 हजार हेक्टर वन क्षेत्र येते. या जंगलात साग, बिब्बा, मोह, कांडोळ, अंजन, अर्जुन, बेहडा, धामोडी आदी जैवविविधतेच्या दृष्टीने महत्वाचे झाडे मोठ्या प्रमाणात आहेत मात्र, वीट भट्टी चालक, लाकूड तस्कर, नानेगाव, जंजाळा, वेताळवाडी येथील सागवान फर्निचर, शेती चे औजार बनवणारे यांनी जंगल मे मंगल करत वन संपत्ती तोडून लूट सुरु केली आहे.

 यातच आता भर पडली आहे ती खाद्य डिंक व औषधी उपयोगी व धूप / लोभान साठी लागणाऱ्या सलई डिंक चुकीच्या पद्धतीने काढून झाडांचे जीव घेण्याचा विडाच संबंधित ठेकेदार व वनविभागाचे कर्मचारी यांनी घेतला आहे. अजिंठा व सोयगाव वन क्षेत्र हे इको सेन्सिटिव्ह क्षेत्र जाहिर होणे हे गरजेचं आहे, कारण जंगल नष्ट झाले तर याचा फटका पर्यटनास बसेल. या भागातील डिंक काढणेचा ठेका हा अजिंठा येथील ठेकेदार यांनी घेतलेला असून 20 वर्षांपासून हे टेंडर एकाच कुटुंबात आहे. 

सदर डिंक काढणारे यांना सक्त सूचना व मार्गदर्शक तत्वे सांगितले असतात की डोंगरातील धा मोडी, सलई, बेहडा, बाबुळ आदी झाडांना जास्त खोल व मोठी जखम न करता डिंक जमा करावा. या 4 वर्षात अधिक डिंक काढण्यासाठी घातक रसायने वापरण्यात येत आहेत. यात प्रामुख्याने पॅराक्वेट हे विषारी रसायन जे तणनाशक म्हणून वापरले जाते, ते वापरले जातं आहे. सदर रसायने झाडाला जखम करून त्यात स्प्रे केले जाते, त्यामुळे खोडातून लिंफ स्त्राव अधिक स्त्रवतो व सुकल्यावर अधिक डिंक मिळतो. सदर रसायन हे तननाशक असून त्यामुळे ते झाडं सुकून मृत होते. या पद्धतीने संकलित डिंकात हे विषारी रसायन मिश्रित होऊन मानवास अपाय तर होतोच पण जंगलातील माकड, खार, विविध पक्षी व वन्यजीव हे ही हा डिंक खातात व त्यांच्या ही जीवास धोका निर्माण होऊ शकतो. अशी शेकडो झाडे घोसला, अजिंठा, सोयगाव, बनोटी, सावळदबारा, तोंडापूर / राक्षा परिसरात कोलमडून पडली आहेत. हे सर्व प्रकार थांबावे, वन संपदा वाचावी म्हणून सिल्लोड येथील पर्यावरण संवर्धक डॉ. संतोष पाटील यांनी आज उपमुख्यवनसंरक्षक ( डी. सी. एफ.) सुवर्णा माने यांचे कडे तक्रार केली आहे.यावर वनविभाग सोयगाव यांचे वतीने चौकशीचे सोपस्कार केले जात आहे. 
----- इको सेन्सिटिव्ह झोन व्हावे हेच उत्तर- "पॅराक्वेट " या तणनाशक व "ईथेपोन" या प्लांट ग्रोथ प्रमोटर चा सर्रास वापर डिंक अधिक मिळावा म्हणून राज्यात व आमच्या जिव्हाळ्याच्या अजिंठा डोंगररांगेत वाढला आहे. हे अत्यंत घातक आहे.हे क्षेत्र आता " इको सेन्सिटिव्ह झोन व गौताळा अभ्यारण्याचा भाग म्हणून जाहिर व्हावा म्हणून आम्ही समविचारी निसर्ग रक्षक कार्यकर्ते एकत्र येऊन पाठपुरावा करत आहोत. यासाठी एक समिती ही गठीत केली असून, आता हे सर्व जंगल मे अमंगल बंद तर करूच शीवाय पुष्पाराज ही संपवू .
          डॉ. संतोष पाटील, अभिनव प्रतिष्ठान सोयगाव-सिल्लोड.

---- डिंकाचे अर्थकारण - कांडोळ चा डिंक 2 हजार रु किलो विकला जातो. तर सलई चा डिंक ही महाग विकला जातो. सलई चे झाडं खूप नाजूक असते. त्यास आघात झाला की सहज तुटते. सलाई डिंक हा संधिवातावरील औषध उत्पादक उद्योग व धूप / लोभान बनवण्यास 5 हजार रु किलो पर्यंत विकला जातो. या क्षेत्रातून टनाने कोट्यावधी रुपयाचा डिंक काढला जातो, पण टेंडर मात्र लाख भर रुपयाचे असते

कोट:- संबंधित प्रकरणी चौकशी करत आहोत व, योग्य ति कार्यवाही करण्यात येईल.जून पासुन या क्षेत्रातील डिंक काढण्याचे टेंडर बंद करणार 
       श्रीमती सुवर्णा माने, उपमुख्यवन संरक्षक, छत्रपती संभाजी नगर(सहयोगी बातमीदार दिलीप शिंदे सोयगाव)

Post a Comment

0 Comments