राहुरी / प्रतिनिधी : मानवी चुका ह्या अपघाताला कारणीभूत आहेत. रस्ते अपघाताचे प्रमाण चिंतनीय आहे. वाहनांचा प्रचंड वेग, मोबाईल आणि चुकीच्या बाजूने वाहने चालवणे यामुळे अपघात घडतात. रस्त्यावर चुकीला माफी नाही. आपले रस्ते हे बहुरंगी आणि बहुढंगी आहेत. थांबा, पहा आणि मगच रस्ता ओलांडा या गोल्डन मंत्राचे कृपया पालन करा. हेल्मेट व सीट बेल्ट ही आपली कवच कुंडले आहेत. रस्ता ओलांडताना प्रथम उजवीकडे, नंतर डावीकडे पाहून वाहन येत नाही याची खात्री करून मगच रस्ता ओलांडावा. रस्ते सुरक्षा ही आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असल्याचे मत श्रीरामपूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी केले.
तालुक्यातील सात्रळ येथील पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने "रस्ता सुरक्षा अभियान २०२५' या उपक्रमाचा सांगता समारंभ श्रीरामपूरचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. अनंता चंद्रशेखर जोशी यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला प्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या प्रतिमाचे पूजन करून झाले. प्रास्ताविक कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. डॉ. अमित वाघमारे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. सोपानराव शिंगोटे हे होते. यावेळी आरटीओ इन्स्पेक्टर धर्मराज र. पाटील, सचिन सानप, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक हेमंत निकुंभ, उपप्राचार्य डॉ. दीपक घोलप, प्रोफेसर (डॉ.) रामदास बोरसे, स्नेहसंमेलन समिती प्रमुख डॉ. राम तांबे, सांस्कृतिक कार्य अधिकारी डॉ. नवनाथ शिंदे, डॉ. विजय कडनोर, डॉ. एकनाथ निर्मळ, डॉ. भाऊसाहेब नवले, डॉ. विजय पुलाटे, सोनगाव-सात्रळ येथील सरकारमान्य ढुमणे ॲण्ड सन्स मोटार ड्रायव्हिंग स्कुल प्रोप्रा. नंदकिशोर ढुमणे, सौ. संगीता ढुमणे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शनात आरटीओ इन्स्पेक्टर श्री. धर्मराज र. पाटील म्हणाले, रस्त्याचा वापर करताना चांगली संस्कृती बाळगा. दुचाकीवर हेल्मेट आणि चारचाकी गाडी वापरताना सीटबेल्ट वापरा. वाहन चालवताना मोबाईलचा वापर करू नये. मोबाईल हा तुमचा सगळ्यात मोठा दुश्मन आहे. मद्यपान किंवा नशा करून वाहन चालवू नये. सर्व ट्रॅफिक सिग्नल आणि वाहतूक नियमांचे पालन करावे.
यानंतर विद्यार्थ्यांशी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून संवाद झाला. याप्रसंगी विद्यार्थ्यांना 'रस्ता सुरक्षा मार्गदर्शिका' पुस्तिका तसेच माहितीपत्रकाचे विनामूल्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रवरा पोलीस अकॅडमीचे समन्वयक डॉ. गंगाराम वडीतके यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालय युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments