कृषी विद्यापिठाजवळ गॅस वाहनातून गॅस गळती; पोलिस व सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली, घटनेला रस्त्याची दुरावस्था कारणीभूत




राहुरी / प्रतिनिधी : अ'नगर-मनमाड महामार्गावर  महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्र असणाऱ्या धर्माडी टेकडी जवळील पाणी व्यवस्थापन प्रकल्पाच्या समोर गॅस वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या टाकीमधून अचानक गॅस गळती सुरू झाल्याने एकच घबराट उडाली महामार्गावर या गॅसगळतीमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे व विद्यापीठाचे सुरक्षाधिकारी गोरक्षनाथ शेटे यांच्या टिमने प्रसंगावधान राखल्याने मोठी दुर्घटना टळली.

   मंगळवारी सकाळी अ'नगर-मनमाड महामार्गावरील महात्मा फुले कृषी विद्यापीठाजवळील धर्माडी गेस्ट हाऊस जवळ गॅस वाहतूक करत असलेल्या वाहनातून अचानक गॅस गळती सुरू झाली. ही गॅसगळती पाहून महामार्गावरील वाहनधारक प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे पोलिस फौजफाट्यासह तसेच  विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे हेही आपल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांसह हजर होत प्रसंगावधान राखत महामार्गावर असणाऱ्या वाहनांना लांबच रोखून धरत सदर गॅसच्या वाहनातील गॅस  टाक्या पूर्ण रिकाम्या केल्या व घटनेच्या ठिकाणाची परिस्थिती नियंत्रणात आणून पुनश्च वाहतूक सुरळीत केली. घटनास्थळापासून जवळच शंभर ते दिडशे मीटर अंतरावर इंग्लिश मिडियम स्कूल आहे. तर महामार्गाच्या लगत विद्यापीठाची शेती असल्याने येथे बराचसा मजूरवर्ग शेतीकामात व्यस्त होता. पोलिस व सुरक्षा रक्षकांनी वेळीच प्रसंगावधान राखले नसते तर राजस्थान सारखी घटना येथे घडली असती असे प्रत्यक्ष दर्शींनी सांगितले. 

 


चौकट..
नगर मनमाड महामार्गाची सध्याची जीर्ण झालेली  दुरावस्था पाहता अर्धवट काम केलेल्या खड्ड्यांमुळे किंवा एकेरी वाहतूक असल्यामुळे कृषी विद्यापीठ ते राहुरी खुर्द पर्यंत सध्या रस्त्याचे काम करण्यासाठी खोदाई केली आहे हा मार्ग सध्या एकेरी सुरू आहे.  अर्धवट कामामुळे वाहनचालक व प्रवासी अक्षरशः वैतागलेले आहेत. अनेक निष्पापांचे बळी आजवर या महामार्गाने घेतले आहे तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. गेल्या दोन तपांपासून हा महामार्ग आहे तसाच आहे. जिल्ह्याचे कारभारी राज्याला राजकारणाची दिशा देतात. अशी पुर्वीपासून परंपरा आहे. पण या महामार्गाला जिल्ह्याचे कारभारी आजपर्यंत न्याय देवू शकले नाहीत. आजच्या घटनेत पोलिस व विद्यापीठाच्या सुरक्षा रक्षकांनी यशस्वी भुमिका बजावली नसती तर मोठ्या राजस्थान सारख्या अपघाताची पुनरावृत्ती झाली असती नि मोठी जिवितहानीही झाली असती.  


चौकट...
राहुरी पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक संजय ठेंगे व त्यांचे कर्मचारी तसेच विद्यापीठाचे सुरक्षाधिकारी गोरक्षनाथ शेटे व त्यांचे सुरक्षारक्षक यांचे जनतेतून तसेच  महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांतकुमार पाटिल व विद्यापीठ अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून कौतूक होत आहे. 

Post a Comment

0 Comments