दहशतवाद आमचा नाही तर तुमचा ! अडीच वर्षे सत्तेत होतात काय केलं?
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा अस्तगावच्या सभेत विरोधकांना सवाल!
पंतप्रधान मोदी यांच्या उच्च विचार व कर्तुत्वामुळेच देशाची होत आहे मोठी प्रगती--गुजरातचे मा. महसूल मंत्री राजेन दिवेदी,
शिर्डी (प्रतिनिधी) दहशतवाद दहशतवाद असल्याचे विरोधक सांगतात! काय आम्ही कोणाला आतापर्यंत दडपशाही किंवा कुठे काही दहशत केली. कोणावर अन्याय केला?हे तुम्हाला कधी आठवते का? विनाकारण दहशतवाद असल्याची अफवा जाणीवपूर्वक निर्माण करायची, व मतदारांची दिशाभूल करायची. खरी दहशत तर तुमची आहे. वडगाव लांडगा येथे आपले हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी ग्रामपंचायतीची परवानगी मिळू नये म्हणून आपण प्रयत्न केले. असा आ. थोरात यांना टोला लगावत लाडक्या बहिणींना सत्ता आल्यावर तीन हजार रुपये देऊ म्हणतात ,सत्ता तर येणे सोडाच पण या अगोदर अडीच वर्षे सत्तेत होते. तेव्हा आपण काय केलं? असा सवालही ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी अस्तगाव येथील शुक्रवारी सायंकाळी झालेल्या जाहीर सभेत विरोधकांना केला.
अस्तगाव येथे प्रचारार्थ जाहीर सभेला ना. विखे यांचे आगमन होताच त्यांचे डोलीबाजा व फुलाची उधळण करत स्वागत करण्यात आले. त्यानंतर ग्रामपंचायत, विविध संस्था मुस्लिम बांधव, धनगर बांधव यांच्या वतीने ना. विखे पा.यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना ना. विखे पुढे म्हणाले की, शरद पवार यांनी नुकतेच राहत्याला येऊन येथील पाण्यासंदर्भात टीका केली मात्र खरा समन्यायी पाणी वाटप करारावर त्यांच्या शेजारी बसलेल्या नेत्यांच्या सह्या आहेत. त्यांना तुम्ही पहिले विचारा! तसे तुम्ही त्यांना विचारू शकता का? असा सवालही त्यांनी यावेळी केला.
शिर्डी येथे आयटी पार्क उभारण्यासाठी श्री.साईबाबा संस्थानला शेती महामंडळाची जमीन मंजुर झाल्याचा ठराव माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जाणीवपूर्वक रद्द करुन, आयटी पार्कच्या उभारणीत खोडा घातला असल्याचा थेट आरोप ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. आयटी पार्कवर भाष्य करणा-या शरद पवारांनी याची जरा माहीती घेवून आपल्या शेजारी बसणा-या संगमनेरच्या नेत्याला ते जाब विचारणार का? असा प्रश्नही त्यांनी आपल्या भाषणात उपस्थित केले. राहात्यात येवून जाणत्या राजांनी बरीच मुक्ताफळे उधळली. यामध्ये त्यांनी शिर्डी येथील आयटी पार्कचा उल्लेख करुन हे काम कोणी होवू दिले नाही .अशा केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना त्यांनी याबाबतची सविस्तर माहीतीचे कागदपत्रच सभेमध्ये दाखविले.
शेती महामंडळाची जमीन संस्थानला देण्याचा ठराव तत्कालिन महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ७ जुलै २०१७ रोजी झाला होता. त्यामध्ये १३१ एकर जमीन देण्याचा निर्णय केला होता. मात्र आघाडी सरकार मधील महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी २३ फेब्रुवारी २०२१ रोजी घेतलेल्या बैठकीत या १३१ जागेचा मंजुर झालेला ठराव रद्द केला. त्यामुळे शिर्डी येथील आयटीपार्कच्या उभारणीत कोणी खोडा घातला याची माहीती आता पवार साहेबांनीच घ्यायची असे थेट आव्हान ना.विखे पाटील यांनी दिले.गोदावरी कालव्यांचे पाणी कमी झाल्याचा उल्लेख पवार यांनी आपल्या भाषणात केला होता. यावरही सडकून टिका करताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, २००५ साली समन्यायी पाणी वाटप कायदा ज्यांनी केला त्यांना तुम्ही बरोबर घेवून बसता मग हा कायदा थांबविण्याचे धाडस तुम्ही का दाखविले नाही. कारण तुम्हाला जिल्ह्यामध्ये केवळ पाणी प्रश्नावरुन झुंडी जावून द्यायच्या आहेत. वरच्या धरणाचे पाणी एक्सप्रेस कालव्याने तुम्ही थेट गंगापूरकडे वळविले, याकडे दुर्लक्ष कसे करता.
निळवंडे धरणाच्या बाबतीतही मुख्यमंत्री असून सुध्दा निळवंडे धरणाच्या बाबतीतही पवारांची हीच भूमिका राहीली. जिल्ह्यात येवून चार चार वेळा भूमीपुजनं केली. पण धरणाच्या कामाला निधीची तरतुद तुम्ही करु शकला नाहीत. इकडचा निधी कमी करुन, पुणे जिल्ह्यातील धरणांना तुम्ही किती निधी दिला असा प्रश्न उपस्थित करुन, केवळ खासदार साहेबांना बदनाम करण्याचे हे कटकारस्थान होते. यामध्ये जिल्ह्यातील काही पुढारी बळी पडल्याचे त्यांनी सांगितले.
पक्षांतर केल्याची टिका आमच्यावर करता पण पक्ष फोडण्याचे सर्वात मोठे पाप हे तुम्ही आतापर्यंत तुम्ही केले आहे. राजकारणातील सर्वात विश्वासघात तुम्ही केल्याचा आरोप त्यांनी केला. जिल्ह्यातील कुकडीच्या कामाचा उल्लेख करुन, मंत्री विखे पाटील म्हणाले की, जिल्ह्याच्या हक्काचे पाणी त्यांनी मिळू दिले नाही. पवारांच्या काळात कुकडी कालव्याचे अवघे १० कि.मी काम झाले. पण राज्यात युती सरकार आल्यानंतर मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली ७० कि.मीचे काम होवू शकले. या जिल्ह्याचा वापर पवारांनी फक्त भांडणे लावण्यासाठी केला. जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनीच अडथळे आणले.
राज्यात अडीच वर्षात महायुती सरकारने योजनांच्या माध्यमातून लोकांना मदत केली. आपण केवळ शिर्डी पुरते नाही तर, जिल्ह्याच्या विकासालाही निधी उपलब्ध करुन दिला. अहिल्यादेवींचे स्मारक, नेवासा येथील ज्ञानेश्वरसृष्टी, शिर्डी येथील थिमपार्क आणि जिल्ह्यातील युवकांना जिल्ह्यातच रोजगार निर्मितीसाठी तीन औद्योगिक वसाहतींना जागेची उपलब्धता करुन दिली. यापुर्वीही या जिल्ह्याला मंत्रीपद मिळाले होते. पण त्यांना हे का सुचले नाही. खंडकरी शेतक-यांना विनामुल्य जमीनी देण्याचा एैतिहासिक निर्णय झाला. भोगवटा वर्ग एक विनामुल्य करुन दिले.
गणेश कारखान्याचा उल्लेख करुन मंत्री विखे पाटील म्हणाले की, हा कारखाना चालवायला घेतला नसता तर तो सभासंदाच्या मालकीचा राहीला नसता. पण शेतक-यांचे हित डोळ्यासमोर ठेवून आम्ही तो चालविला म्हणूनच तो शेतक-यांचा राहीला. झालेला पराभव आम्ही मान्य केला. पण त्याचे काहीजण खुप भांडवल करीत आहेत. कारखाना आम्ही फक्त चालविला. मात्र सभासद आम्ही वाढविले नाहीत .याकडेही त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. काल न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत करुन, फुल उत्पादक आणि विक्रेत्यांना मोठा दिलासा मिळाला. पण अनेक जण यांचे श्रेय घ्यायला पुढे येत आहेत. असे त्यांनी यावेळी सांगितले.
या सभेमध्ये गुजरात राज्याचे भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष व माजी महसूल मंत्री राजेंद्र त्रिवेदी यांनी हिंदीतून बोलताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींची सोच मोठी आहे. त्यामुळेच देशाचा विकास व प्रगती झपाट्याने होत आहे. त्यांचे उच्च विचार देशाला प्रगतीवर नेत आहेत. त्यांनी गुजरातमध्ये नर्मदा सरोवराजवळ 182 मीटर उंच सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगात सर्वात उंच असा पुतळा बनवला. हा पुतळा 182 मीटरच
का तर गुजरात विधानसभेत 182 आमदार आहेत. या आमदारांचे सामायिक प्रतिनिधित्व असणारा हा पटेल यांचा पुतळा त्याचे नावही स्टॅच्यू ऑफ युनिटी असे आहे. असे त्यांचे विचार आहेत. पंतप्रधान मोदी यांनी युरोपात असलेले 250 टन सोने भारतात आणले त्यामुळे येथील आर्थिक विकासाला गती मिळत आहे. त्यांचे दहशतवाद संपवण्यासाठी प्रथम प्राधान्य आहे. असे सांगत भारत एक देश आहे व या देशात अनेक राज्य आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र हे मोठे राष्ट्र असे राज्य आहे व या महाराष्ट्राची देश विकासासाठी मोदींना साथ हवी आहे, ताकद हवी आहे. त्यासाठी महाराष्ट्रात कुशल काम करणाऱ्या ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तत्पूर्वी अनेक स्थानिक नेत्यांची भाषणे झाली. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने अस्तगाव व परिसरातील कार्यकर्ते, मतदार, महिला, युवक उपस्थित होते.
0 Comments