शिर्डी (प्रतिनिधी) शेतीमध्ये सोलर पंप, ड्रिप ,मल्चिंग अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा व पद्धतीचा वापर करून भरघोस उत्पन्न घेण्यासाठी वेगवेगळे प्रयोग, परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन, गटशेतीने विविध पिकांची लागवड, जैविक शेती याद्वारे शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षीच आपल्या कर्तुत्वाची नोकरीत व शेतीमध्ये चुणूक दाखवणारे व अनेक अधिकारी, शेतकरीवर्ग यांची पाठीवर शब्बासकीची थाप मिळवणारे दीपक हरिश्चंद्र हारदे यांना नुकताच बिंदास डिजिटल माध्यम समूहाचा बिंदास युवा शेतकरी पुरस्कार घोषित झाला असून तो बिंदास माध्यम समूहाच्या सातव्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात दीपक हरिश्चंद्र हारदे यांना प्रदान करण्यात येणार आहे.
बिनधास्त माध्यम समूहाचा सातवा वर्धापन दिन सोहळा 26 फेब्रुवारी 2025 बुधवार रोजी सकाळी अकरा वाजता सुरज लॉन्स ,स्टेशन रोड वैजापूर येथे आयोजित करण्यात आला असून त्यानिमित्ताने विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. या मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार दीपक हरिचंद्र हारदे यांना प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार दीपक हरिचंद्र हारदे यांना जाहीर झाल्यापासून त्यांचे सर्व क्षेत्रामधून अभिनंदन होत आहे. दीपक हरिचंद्र हारदे हे प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प संजयजी महाराज जगताप भऊरकर यांचे नातलग आहेत.
दीपक हरिचंद्र हारदे हे सुशिक्षित असून चांगली नोकरी करत आहेत. नोकरी करत असताना त्यांनी आपली शेती अगदी आधुनिक पद्धतीने करत जिरायतीची बागायती केली आहे.
संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुका हा प्रामुख्याने दुष्काळी असा भाग आहे. या भागामध्ये जिरायती पिके हाच एकमेव पर्याय असून त्यातूनही जेमतेम असे उत्पन्न मिळते. मात्र दीपक हरिश्चंद्र हारदे हे वैजापूर तालुक्यातील सिद्धापूर या ग्रामीण भागातील असून त्यांची जिरायती शेती होती. अगदी अत्यल्प उत्पन्न त्यातून मिळत होते. त्यामुळे घरची परिस्थिती गरिबीची मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीत इयत्ता दहावीचे शिक्षण झाल्यानंतर त्यांनी मेकॅनिकल डिप्लोमा रोटेगाव येथे पूर्ण केला व इंजिनिअरिंगचे शिक्षण विखे फाउंडेशन अहमदनगर येथे पूर्ण केले. त्यानंतर आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर टीसीएस मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर या पदावर नोकरी मिळवली. नोकरी करत असतानाच त्यांनी आपल्या शेतीकडेही बारकाईने लक्ष दिले. आधुनिक तंत्रज्ञान वापरून आधुनिक पद्धतीने शेती करत जिरायतेची बागायती केली. आता सध्या त्यांच्या शेतामध्ये दोन एकर क्षेत्रावर एन एम के गोल्डन सिताफळ व दोन एकर क्षेत्रावर पिंक तैवान पेरूची लागवड केली आहे. परिसरामध्ये प्रथमच सत्तर गुंठे क्षेत्र मल्चिंग वर कांदा लागवड करून एकरी रोपांची संख्या तीन लाख 37 हजार मिळवली आहे. यामध्ये त्यांना एकरी एक लाख जास्त रोपे मिळवली .त्यातून त्यांना भरघोस कांद्याचे उत्पन्न मिळणार आहे. त्यांची मेहनत, प्रयत्न यांना विविध योजनांचीही साथ मिळाली असून यामध्ये मुख्यमंत्री सोलर पंप योजनेतून सोलार, अनुदानित कांदा चाळ, एमआरजीएस मधून फळबाग लागवड ,या सर्व योजना तसेच आपल्या कर्तुत्वामुळे वैजापूर तालुक्यात व परिसरात त्यांचा प्रयोगशील युवा शेतकरी म्हणून नावलौकिक झाला आहे व या सर्वांची दखल घेत बिंदास्त माध्यम समूहाच्या वतीने त्यांना यावर्षीचा बिंदास युवा शेतकरी हा पुरस्कार जाहीर केला असून तो 26 फेब्रुवारी 2025 रोजी वैजापूर येथे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. जिद्द ध्येय असेल तर सर्व काही शक्य होते. त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागते. ती केली तर नक्कीच यश मिळाल्याशिवाय राहत नाही .असे दीपक हरिश्चंद्र हारदे यांनी म्हटले असून युवकांनी नोकरीच्या मागे न लागता आपली शेती आधुनिक पद्धतीने, विविध तंत्रज्ञान वापरून व शासनाच्या कृषी योजनांचा फायदा घेऊन विकसित केली तर नक्कीच चांगले उत्पन्न मिळू शकते. शेतकऱ्यांनी ही विविध मार्गदर्शन व विविध योजना, आधुनिक पद्धत अवलंब करून शेती केली तर नक्कीच आपले जीवनमान सुधारू शकते. असे सांगत आपली या पुरस्काराबद्दल निवड झाली व आपले अनेक क्षेत्रातून अभिनंदन होत असल्याबद्दल दीपक हरिश्चंद्र हारदे यांनी बिनधास्त माध्यम समूहाचे व अभिनंदन करणाऱ्या सर्वांचेच धन्यवाद मानले आहेत. अशी माहिती ह भ प संजयजी महाराज जगताप यांनी दिली आहे.
0 Comments