पुणे ( प्रतिनिधि ) : पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे दि. २७ जुन २०२६ रोजी महाराष्ट्रातील माजी सैनिक संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा व असंख्य माजी सैनिकांचा राज्यस्तरीय मेळावा उत्साहात संपन्न झाला. मेळाव्या प्रसंगी माजी सैनिक हिताच्या दृष्टीने विविध महत्त्वपूर्ण विषयांवर माजी सैनिक संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी विचार मांडले. दरम्यान उपस्थित माजी सैनिकांमध्ये विविध बाबींवर साकारात्मक चर्चा झाली.
मेळाव्यात बोलताना माजी सैनिकांचे राज्यप्रमुख तथा राष्ट्रवादी माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष दिपक राजे शिर्के म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारने चुकीची असलेली अग्निवीर भरती प्रक्रिया पध्दत बंद करून तरुण सैनिकांना देशसेवेसाठी कायम करून घ्यावे. तसेच नोव्हेंबर ते डिसेंबर मध्ये निवृत्त होणाऱ्या पहिल्या "अग्निवीर" सैनिकांच्या तुकडीच्या भविष्यासाठी राज्य व केंद्र शासनाने तातडीने ठोस व सकारात्मक धोरण आखावे, माजी 'अग्निवीर' सैनिकांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन व्हावे अशी प्रखर आग्रही मागणी केली.
मेळाव्यातील प्रमुख व क्रांतीकारी ठराव :
राजकीय व शासकीय नौकरीत योग्य आरक्षण :
माजी सैनिकांना राजकीय क्षेत्रात विशेष आरक्षण मिळावे तसेच सर्व राज्य व केंद्रातील शासकीय नोकरीसाठी माजी सैनिकांना योग्य प्रमाणात प्राधान्य मिळावे.
माजी 'अग्निवीर' सैनिकांचे पुनर्वसन :
लवकरच नोव्हेंबर डिसेंबरमध्ये निवृत्त होणाऱ्या पहिल्या 'अग्निवीर' तुकडीच्या भविष्याच्या दृष्टिने राज्य व केंद्र शासनाने तातडीने ठोस व सकारात्मक धोरण आखावे.
सैनिक महामंडळ व सैनिक समित्यांवर नियुक्ती :
सैनिक महामंडळ तसेच माजी सैनिकांशी संबंधित विविध शासकीय समित्यांवर केवळ माजी सैनिकांनाच अध्यक्ष, संचालक , सदस्य म्हणून नियुक्ती मिळावी.
मेळाव्या प्रसंगी कर्नल दिपक ठोंगे साहेब (संचालक, सैनिक कल्याण विभाग) मेजर शिल्पा खरपकर मॅडम (उपसंचालक, सैनिक कल्याण विभाग), शिवाजी कदम साहेब (अध्यक्ष, शिखर संघटना) दिपकराजे शिर्के साहेब (प्रदेशाध्यक्ष, माजी सैनिक सेल), लेफ्टनंट कर्नल सतीश हंगे यांनी मार्गदर्शन पर विचार मांडले. यावेळी जगन्नाथ खामकर साहेब, देवदास साबळे साहेब, श्रीमंत राठोड (प्रदेश उपाध्यक्ष), ज्ञानेश्वर साखरे (प्रदेश कार्यकारणी सदस्य), धुमाळ साहेब (पुणे जिल्हाध्यक्ष), अर्जुन दसगुडे (शिरूर तालुका अध्यक्ष) तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले विविध संघटनांचे पदाधिकारी व माजी सैनिक बांधव उपस्थित होते.
मेळाव्याचे संयुक्त आयोजक माजी सैनिक किसान एकता शिखर संघ, भारतीय माजी सैनिक संघटना, माजी सैनिक सेल व सर्व संलग्न माजी सैनिक संघटना यांनी केले होते. मेळावा यशस्वीते साठी माजी सैनिकांचे योगदान लाभले.
जय जवान, जय किसान..!
0 Comments