दिलीप शिंदे
सोयगाव दि.०२-- सोयगाव तालुका खरेदी विक्री संघाचे पाचोरा (जि. जळगाव) कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये संघाच्या आडत विभागात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी संघाचे संचालक मंगेश सोहनी,मयुर मनगटे,समाधान बावस्कर व सुनील पाटील यांनी जिल्हा निबंधक छत्रपती संभाजीनगर यांच्या कडे लेखी तक्रार दिल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, पाचोरा (जि.जळगाव) कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये सोयगाव तालुका खरेदी विक्री संघाचे आडत विभाग असून येथे संस्थेचा कर्मचारी प्रवीण प्रभाकर कऱ्हाळे यांनी सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षा मध्ये संस्थेचा १४,७३,६२७/- रूपयांचा अपहार केला असून या विषयी संस्थेचे व्यवस्थापक टाळाटाळ करत असून आपण त्रिसदस्यीय समिती गठीत करून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून या मध्ये दोषींना शिक्षा करावी असे सहकार मंत्री, जिल्हा निंबंधक यांना सोयगाव तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक मंगेश सोहनी, मयुर मनगटे, समाधान बावस्कर व सुनील पाटील यांनी दिलेल्या लेखी निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी माहिती घेण्यासाठी संस्थेचे व्यवस्थापक बी. टी. बेडवाल यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. दरम्यान याप्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करण्यात येईल की राजकीय दबावाच्या हस्तक्षेपामुळे गुलदस्त्यात राहील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
0 Comments