शिर्डीत श्री साईंच्या प्रतिमा ,पोथी व विना मिरवणुकीने श्री रामनवमी उत्सवाला उत्साहात सुरुवात!उद्या 26 मार्चला श्रीराम नवमी उत्सवाचा मुख्य दिवस! रात्रभर श्री समाधी मंदिर दर्शनासाठी राहणार खुले!

शिर्डी ( राजकुमार गडकरी)-शिर्डी येथील
 श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेच्या वतीने आयोजित श्री रामनवमी उत्सवास आज बुधवार 25 मार्च 2026 रोजी उत्साही व भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. श्री साईबाबा समाधी मंदिर व परिसरात करण्‍यात आलेल्‍या विद्युत रोषणाई व फुलांच्‍या सजावटीने भाविकांचे लक्ष वेधुन घेतले. 
 आज बुधवारी उत्सवाच्या प्रथम दिवशी पहाटे ०५.१५ वाजता श्रींची काकड आरती झाल्‍यानंतर श्रींची प्रतिमा, पोथी व विणाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी साईसंस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी पोथी, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी विणा घेऊन तर प्रशासकिय अधिकारी संदीपकुमार भोसले व अतुल वाघ यांनी प्रतिमा घेवून सहभाग घेतला. यावेळी मंदीर विभाग प्रमुख विष्‍णु थोरात,जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे, संस्थांनचे माजी विश्वस्त सचिन तांबे ,मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 मिरवणूक व्दारकामाई मंदिरात आल्यानंतर तेथे श्री साईसच्चरित्र या पवित्र ग्रंथाच्या पारायणाचा शुभारंभ मा. मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी प्रथम अध्याय, प्रशासकीय अधिकारी संदिपकुमार भोसले यांनी व्दितीय अध्याय, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी तृतीय अध्याय, प्र. अधिक्षक, सामान्‍य प्रशासन रामदास कोकणे यांनी चौथा अध्याय व वित्‍त व्‍यवस्‍थापक, श्री साईबाबा हॉस्‍पीटल साहेबराव लंके यांनी पाचवा अध्याय वाचन करुन केला. 
उत्सवाचे निमित्ताने मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्‍यांच्‍या सुविद्य पत्‍नी सौ. वंदना गाडीलकर यांच्‍या हस्‍ते मंदिरात श्रींची पाद्यपूजा करण्‍यात आली. दुपारी १२.३० वाजता श्रींची माध्यान्ह आरती झाली. दु. ०१.०० ते ०३.०० वा. श्री मधुसुदन भुवड, मुंबई यांचा साईराम संगीत संध्‍या कार्यक्रम तर सायं.०४.०० ते ०६.०० यावेळेत ह.भ.प. विक्रम नांदेडकर, गोरटे यांचा कीर्तन कार्यक्रम श्री साईबाबा समाधी शताब्‍दी मंडप येथे मोठ्या उत्साहात संपन्‍न झाला. तर सायंकाळी ०६.३० वा. श्रींची धुपारती होवून रात्रौ ०७.०० ते ०९.३० यावेळेत पार्श्‍वगायिका अनुपमा देशपांडे, मुंबई यांचा साई भजन हा कार्यक्रम असून रात्रौ ०९.१५ वा. श्रींच्‍या पालखीची गावातून मिरवणूक काढण्‍यात येईल. श्रींची शेजारती रात्रौ १०.३० वा. (पालखी मिरवणूक परत आल्‍यानंतर) होईल. प्रथम दिवशी अखंड पारायणासाठी व्‍दारकामाई मंदिर रात्रभर खुले राहणार आहे. यावर्षी उत्सवाच्या निमित्ताने साईभक्त श्री. वेंकट सुब्रमण्‍यन, बैंगलोर यांच्‍या देणगीतून मंदिर व परिसरात केलेली फुलांची आकर्षक सजावट, व्‍दारकामाई मंडळ यांचे वतीने करणेत आलेली आकर्षक विद्युत रोषणाई व ४ नंबर प्रवेशव्‍दाराचे आतील बाजुस करणेत आलेल्‍या श्रीसाई मयुर द्वार या भव्‍य काल्‍पनिक देखाव्‍याने साईभक्‍तांचे लक्ष वेधुन घेतले. दरवर्षीप्रमाणे मुंबई व राज्यातील अनेक भागातून आलेल्‍या पालखी पदयात्री भाविकांनी उत्‍सवात हजेरी लावली. दरम्यान शिर्डी येथे मुंबईसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने पायी साई पालख्या शिर्डीत दाखल झाले असून सर्व पालख्यांचे व साई पदयात्रांचे जोरदार स्वागत करण्यात येत होते. शिर्डीत सर्वत्र साई नामाचा गजर ऐकू येत आहे. साई भक्तांनी साईनगरी दुमदुमून गेली आहे.
उद्या उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी, गुरुवार दिनांक २६ मार्च रोजी पहाटे ०५.१५ वा. श्रींची काकड आरती, पहाटे ०५.४५ वा. अखंड पारायणाची समाप्‍ती होवून श्रींचे पोथी व प्रतिमा मिरवणूक होईल. सकाळी ०६.२० वा. कावडी मिरवणूक, श्रींचे मंगलस्‍नान व दर्शन. सकाळी ०७.०० वा. श्रींची पाद्यपुजा, सकाळी १०.०० ते १२.०० यावेळेत ह.भ.प. विक्रम नांदेडकर, गोरटे यांचा श्रीरामजन्‍म कीर्तन कार्यक्रम व जन्मोत्सव सोहळा श्री साईबाबा समाधी शताब्‍दी मंडप येथे संपन्न होईल. तर दुपारी १२.३० वा. श्रींची माध्‍यान्‍ह आरती होणार आहे. दुपारी ०१.०० ते ०३.०० वा. यावेळेत श्री. तुकाराम दैठणकर प्रस्‍तुत शेहनाई म्‍युझिाकल इव्‍हेंट यांचा भक्‍ती गीत, अभंग वाणी, शास्‍त्रीय संगीत कार्यक्रम, दुपारी ०३.०० ते ०५.०० वा. यावेळेत श्री. जागृत कोहली, आग्रा यांचा साईभजन कार्यक्रम, दुपारी ०४.०० वा. निशाणाची मिरवणूक तर सायं. ०५.०० वा. श्रींचे रथाची गावातुन मिरवणूक होणार आहे. सायं. ०६.३० वा. श्रींची धुपारती(श्रींचे रथाची मिरवणूक परत आल्‍यानंतर) होईल. तसेच सायं. ०७.०० ते ०९.३० यावेळेत फिल्‍मफेअर पुरस्‍कार प्राप्‍त प्रसिद्ध संगीतकार आनंद मिलींद, मुंबई यांचा साईभजन संध्‍या कार्यक्रम होणार असून या दिवशी गुरुवार असल्‍याने रात्रौ. ०९.१५ वा. पालखीची मिरवणुक होईल. रात्रौ १०.०० ते पहाटे ०६.०० वाजेपर्यंत श्रींचे समोर इच्‍छुक कलाकारांचा हजेरी कार्यक्रम होईल. गुरुवारी उत्सवाच्या मुख्य दिवशी समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले राहील. त्‍यामुळे दिनांक २६ मार्च रोजीची नित्‍याची शेजारती व दिनांक २७ मार्च रोजीची पहाटेची काकड आरती होणार नाही. श्रीरामनवमी उत्सव यशस्वी पार पाडण्याकामी श्री साई संस्थांनचे त्रीसदस्यीय समिती तसेच संस्थांनचे सर्व आधिकारी ,कर्मचारी मोठे परिश्रम घेत आहेत.

Post a Comment

0 Comments