प्रत्येक सणांचा उद्देश हा उपदेश देणे नाही तर आनंद, प्रेम व ऐक्य वाढवणे असून दिवाळीत फटाक्यांवर उपदेश नको--महंत आत्मारामगिरीजी महाराज

शिर्डी ( प्रतिनिधी)- दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव, अंध:कारावर ज्ञानाचा विजय, आणि स्नेह, आनंद, दान, व भक्ती यांचा संगम होय.प्रत्येक भारतीयाच्या आयुष्यात या सणाचे स्थान अनन्यसाधारण आहे.

परंतु गेल्या काही वर्षांपासून दरवर्षी एक नवा ट्रेंड दिसतो .काही प्रसिद्ध कलाकार, सामाजिक माध्यमांवरील प्रभावशाली व्यक्ती, किंवा स्वयंघोषित पर्यावरणप्रेमी दिवाळीच्या काळात फटाके न फोडण्याचे “उपदेश” देताना दिसतात.त्यांचा हेतू पर्यावरणविषयक जागरूकता वाढवण्याचा असू शकतो, परंतु प्रश्न असा आहे की, हा उपदेश फक्त हिंदू सणांपुरता का मर्यादित असतो. परंपरेवर उपदेश, पण इतर सणांवर मौन का? असं सवाल करत मंहत आत्मारामगिरीजी महाराज यांनी पुढे म्हटले आहे की,जेव्हा इतर धर्माच्या एखाद्या सणाला लाखो जनावरांचे बलिदान दिले जाते, तेव्हा कोणी त्याविषयी पर्यावरण किंवा प्राण्यांबद्दल चिंता व्यक्त करताना दिसत नाही.
जेव्हा इतर धर्मांतील सणांमध्ये ड्रम, फटाके, गर्दी, किंवा मोठ्या प्रमाणात संसाधनांचा वापर होतो, तेव्हा कुणी “प्रदूषण”चा मुद्दा पुढे करत नाही.
मग हिंदूंच्या दिवाळीच्या वेळीच का ही चिंता? असा प्रश्न करत
हे दुहेरी मापदंड समाजात तणाव निर्माण करतात.
हिंदू समाजाला नेहमीच आपला सण, परंपरा, आणि श्रद्धा यांचे समर्थन करताना “संवेदनशील” व्हावे लागते. पण धर्मनिरपेक्षतेचा खरा अर्थ म्हणजे सर्व धर्मांविषयी समान आदर आणि समान मापदंड राखणे.फटाके हे आमच्या परंपरेचा एक भाग‌आहे.
फटाके ही केवळ मौजमजेसाठी नाहीत. दिवाळीच्या काळात फटाके फोडण्यामागे धार्मिक आणि सांस्कृतिक अर्थ आहे.
दुर्गंध आणि कीटकांपासून संरक्षण, अंध:काराचा नाश, आणि प्रभू श्रीरामांनी लंकेवरून परतल्यावर लोकांनी आनंदाने आकाश उजळवले. ही परंपरा आहे.फटाक्यांचा उद्देश उत्सव साजरा करणे हा आहे, निसर्ग नाश करणे नाही.आज तंत्रज्ञानाने आपण पर्यावरणपूरक “ग्रीन फटाके” उपलब्ध करून दिले आहेत. त्यांचा वापर करून आपण परंपरा आणि पर्यावरण दोन्ही सांभाळू शकतो.
 प्रदूषणाचा प्रश्न हा फक्त सणापुरता नाही, संपूर्ण समाजाचा आहे.प्रदूषण हा नक्कीच गंभीर विषय आहे.
परंतु ते फक्त एका सणापुरते मर्यादित करून बोट दाखवणे अन्यायकारक आहे.वाहनांचा धूर, कारखाने, प्लास्टिकचा वापर, वीजेचा अपव्यय, वृक्षतोड  हे सर्व प्रदूषणाचे मूळ कारण आहेत.फक्त दिवाळीच्या दोन दिवसांत फटाके फोडल्याने पृथ्वी उद्ध्वस्त होत नाही.सततचे प्रदूषण टाळण्यासाठी सर्वांनी जबाबदारीने वागणे आवश्यक आहे.चित्रपटसृष्टीतील कलाकार समाजावर प्रभाव टाकतात, म्हणून त्यांची जबाबदारी अधिक आहे.ते सर्व धर्म, सर्व सणांकडे समान दृष्टीने पाहतील तर समाजात सौहार्द आणि आदर वाढेल.पण जर त्यांनी केवळ एका धर्माच्या सणांवर उपदेश केला, तर समाजात असंतुलन आणि अविश्वास निर्माण होतो.
सणांचा उद्देश, उपदेश देणे नाही, आनंद, प्रेम आणि ऐक्य वाढवणे हा आहे.सर्व धर्मांविषयी आदर करणे  हेच भारतीयत्वाचे लक्षणं आहेत.भारतभूमी ही विविधतेत एकतेचे प्रतीक आहे.
हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिस्ती, बौद्ध  हे सर्व धर्मांनी एकत्र राहून या भूमीला आध्यात्मिक सामर्थ्य दिले आहे.
म्हणूनच प्रत्येकाने दुसऱ्याच्या सणाचा आदर करावा, हस्तक्षेप नाही.जो आपल्या धर्मावर प्रेम करतो आणि इतरांच्या श्रद्धेचा सन्मान करतो, तोच खरा धर्मनिष्ठ आहे.दिवाळी ही आमची परंपरा आहे, आमचा उत्सव आहे, आणि आमचा अभिमान आहे.कोणी फटाके फोडावेत की नाही हे प्रत्येक व्यक्तीचा वैयक्तिक निर्णय असावा, पण संपूर्ण समाजाला उपदेश करण्याचा अधिकार कोणालाही नाही.आम्ही प्रदूषण कमी करण्यासाठी जागरूक आहोत, पण आमच्या श्रद्धा आणि संस्कृतीत कोणालाही बोट दाखवू देणार नाही.प्रत्येक धर्माला आपला सण साजरा करण्याचा अधिकार आहे  आणि प्रत्येकाला दुसऱ्याच्या श्रद्धेचा सन्मान करण्याची जबाबदारी आहे.
हीच खरी दिवाळीची प्रकाशवाट आहे. असे सडेतोड मत
महंत आत्माराम गिरी महाराज
(श्री नर्मदेश्वर संन्याशी आत्मारामगिरी आश्रम) यांनी व्यक्त केले आहे.

Post a Comment

0 Comments