माता पिता हे देवस्वरूप आहेत त्यांची सेवा म्हणजेच ईश्वर सेवा ---ह भ प संजयजी महाराज जगताप ( भऊरकर)



राजकुमार गडकरी 
शिर्डी (प्रतिनिधी) भारत देश विविध संत, महात्म्यांनी व विविध धार्मिक परंपरांनी नटलेला असा सुसंस्कृत देश आहे. अशा देशात महाराष्ट्र  हे सर्वात जास्त संत मंहत यांच्या अध्यात्मिक विचारावर चालणारे राज्य असून अशा या देशामध्ये मातृदेवो भव, पितृ देवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव,असे म्हटले जाते .इतरत्र जगामध्ये असे कुठेही म्हटले जात नाही , इतकी आदर्श संस्कृती जगाच्या पाठीवर आपल्या देशासारखी कुठेही नाही. माता पिता हे देव स्वरूप आहेत.त्यांची सेवा ही ईश्वर सेवा आहे.असे प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प संजयजी महाराज जगताप (भऊरकर )यांनी म्हटले आहे. राहाता तालुक्यातील पिंपळवाडी येथील कै. गोरक्षनाथ रावजी पा. तुरकणे यांच्या प्रथम वर्ष श्राद्ध दिनी पिंपळवाडी येथे तुरकणे पा. यांच्या वस्तीवर वारकरी रत्न ह भ प संजयजी महाराज जगताप (भऊरकर) यांचे सुश्राव्य असे कीर्तन संपन्न झाले. 

या कार्यक्रमाला युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील हे उपस्थित होते. या कार्यक्रमात देहू येथून आणलेल्या पगडी व पुष्पहार अर्पण करत डॉक्टर सुजय विखे पाटील व ह भ प संजयजी महाराज जगताप यांचा तुरकणे परिवारातर्फे सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे कै. गोरक्षनाथ रावजी पा. तुरकणे यांना 75 वर्ष हे जीवन मिळाले त्यामुळे तुरकणे परिवाराच्यावतीने 75 जोडप्यांचा पाची पोषक देऊन सन्मान करण्यात आला.कै. गोरक्षनाथ रावजी पा. तुरकणे हे धार्मिक व सामाजिक वृत्तीचे होते. त्यामुळे त्यांचा संपूर्ण परिवारही धार्मिक व सामाजिक कार्य करत आहे. अशा  कै. गोरक्षनाथ रावजी पाटील तुरकणे यांच्या प्रथम पुण्य स्मरणा निमित्त आयोजित कीर्तन सेवा सादर  करताना ह भ प संजयजी महाराज यांनी ---माता पिता देव गुरु! ऐसा ज्याचा एक विचारू!! धन्य धन्य तयाचे शरीर! नरनोहे तो ईश्वर!! चारी दैवते समान मानी! शरण एका जनार्दनी!!--या श्लोकवर किर्तन सेवा सादर करताना अनेक उदाहरणे देत निरूपण करताना पुढे म्हटले की, आपण विश्वात कुठे गेलो तरी आपली संस्कृती हि तिकडे पाहायला मिळत नाही. माता पिता हे शब्द बघायला मिळत नाही. ऐकायला मिळत नाही. परंतु आपला देश हा विविध संतांच्या विचारांनी घडलेला आहे .
येथे ईश्वरानंतर माता-पिता यांना मोठे स्थान देण्यात आले आहे. हीच येथे होऊन गेलेल्या महा मुनी ,संत, महात्मे, महापुरुषांनी दिलेली देणगी आहे. संस्कृती आहे. महाराष्ट्रात वारकरी परंपरा मोठी आहे. येथे वक्ता, श्रोता, गायक, वादक यांना सारखाच अधिकार आहे. जसा बोलणाऱ्यांना आहे तसा ऐकणारालाही तो अधिकार आहे . असे सांगत आपल्या देशात ईश्वरानंतर माता पितांना अग्रगण्यस्थान आहे. मातापित्यांमध्ये जी शक्ती आहे ती कशातच नाही. म्हणूनच माता-पित्यांची सेवा ही सर्वश्रेष्ठ अशी सेवा आहे. ईश्वर, संत माय,बाप या चार देवतांची जाणीव झाली तर तो ईश्वराला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. असे सांगत संत मोरोपंत कवी म्हणतात श्लोक वाचायचा असेल तर वामनपंडितांचा वाचा, आर्या वाचायच्या असेल तर मोरोपंतांची वाचा, ओवी वाचायचे असेल तर संत ज्ञानेश्वर महाराजांची वाचा व अभंग वाचायचा असेल तर संत तुकाराम महाराजांचा वाचा, असे सर्वश्रेष्ठ ज्ञान त्यामधून मिळते. कारण संथ, श्रीमंत आणि शांत असा त्रिवेणी संगम असणारे  महंत यांनीही माता पिता श्रेष्ठ असल्याचे म्हटले आहे. एवढेच नव्हे तर पंढरपूरचे भक्त पुंडलिक यांचीही माता पिता सेवा आपणास माहित आहे. असे ह भ प संजयजी महाराज जगताप यांनी यावेळी आपल्या कीर्तनातून अनेक उदाहरणे देऊन निरूपण करताना सांगितले. त्याचप्रमाणे तुरकणे परिवार हा नेहमी धार्मिक सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतो. मग दिंडी असो, वारकरी असो किंवा साईभक्त असो त्याचप्रमाणे गावातील, परिसरातील गोरगरीब कोणीही असो त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारा हा परिवार आहे. अशा या परिवाराला कै. गोरक्षनाथ रावजी पाटील तुरकणे यांचे संस्कार मिळालेले आहेत. असा हा भाग्यशाली तुरकणे परिवार असल्यामुळे त्यांनी सर्व जाती धर्मातील 75 जोडप्यांचा यथोचित सन्मान केला. तसेच या कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक धार्मिक आदी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित आहे.हिच तुरकणे परिवार यांच्या  कार्याची पावती आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी उपस्थित राजकीय मान्यवरांनी ‌व साधू मंहतांनीही आपले विचार मांडत कै. गोरक्षनाथ रावजी पाटील तुरकणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने तुरकणे कुटुंबातील सर्व सदस्य , भाऊबंद,नातलग मित्रमंडळी ग्रामस्थ व विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments